उत्पादन ट्रॅकवर आणण्यासाठी लागणार महिना

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

औरंगाबाद - गुड्‌स ॲण्ड सर्व्हिस टॅक्‍स (जीएसटी) लागू झाल्याने औरंगाबादेतील उद्योगांचे उत्पादन सध्या थंडावले आहे. या करप्रणालीत समरस करून घेत उत्पादन पूर्ववत करण्यासाठी त्यांना किमान महिनाभरचा अवधी लागणार आहे. 

औरंगाबाद - गुड्‌स ॲण्ड सर्व्हिस टॅक्‍स (जीएसटी) लागू झाल्याने औरंगाबादेतील उद्योगांचे उत्पादन सध्या थंडावले आहे. या करप्रणालीत समरस करून घेत उत्पादन पूर्ववत करण्यासाठी त्यांना किमान महिनाभरचा अवधी लागणार आहे. 

जीएसटी लागू होण्यापूर्वी औरंगाबादेतील उद्योगांनी या कर प्रणालीच्या स्वागतासाठी कंबर कसली होती. आता कराची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाल्यावर कंपन्यांनी या करानुसार स्वतःला बदलण्याची तयारी सुरू केली आहे. कर लागू झाल्यावर पहिल्याच दिवशी प्रॉडक्‍शन लाइन शांत झाल्या. उद्योगांचे बॅक ऑफिस या कंपन्यांना नव्याने यंत्रणेत बसविण्यासाठी सध्या अहोरात्र काम करीत आहेत. हे काम कितीही वेगाने केले तरी औरंगाबादेतील सगळ्याच उद्योगांना आपले उत्पादन पूर्वपदावर आणण्यासाठी किमान एका महिन्याचा अवधी लागणार आहे. 

जीएसटी लागू झाल्याच्या ४८ तासांच्या कालावधीनंतरही सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन आणि इन्व्हॉईसमध्ये बदल करण्याचे काम सध्या जोरदार सुरू आहे. यामुळे सध्या तरी त्रास वाढला आहे; पण त्यानंतर कामाची पद्धत सुटसुटीत होणार असल्याची अपेक्षा उद्योग क्षेत्राला आहे. 

उद्योगांना उत्पादन करणे सध्या शक्‍य नाही; कारण अतिरिक्त झाल्यास माल ठेवायचा कुठे, याची आडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे मालाची डिस्पॅचही बंदच राहणार आहे.  

काम करून घेणे अवघड
उद्योगांना सेवा पुरविणाऱ्यांची एक साखळी अस्तित्वात आहे. या साखळीत ‘टियर ३’ आणि ‘टियर ४’मध्ये काम करणारे लोक हे  बहुतांश अनरजिस्टर्ड डिलर आहेत. मात्र, त्यांच्याकडून काम घेणे आता मोठ्या उद्योगांना सोपे राहणार नाही. त्यामुळे बिलिंग आणि अन्य कारवायांसाठी अडचणी येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

मनुष्यबळ कमी
ऑनलाइन कारभार करणाऱ्या कंपन्यांना आपल्या कारभारासाठी सुधारित सॉफ्टवेअर इन्स्टॉल करावे लागणार आहे. त्याचे काम सुरू आहे आणि सुधारित व्हर्जनही कंपन्यांनी उपलब्ध करून दिले आहेत; पण त्यांचे इन्स्टॉलेशन आणि अंमलबजावणी करण्यासाठी लागणारे मनुष्यबळ सध्या कमी असल्याने कंपन्यांना आपले काम सुरू करण्यासाठी दिरंगाई होत असल्याचे पाहायला मिळते आहे. 

कोडिंगचे काम सुरू
उद्योगांमध्ये ऑनलाइन कामात बदल करण्याचे काम सुरू असतानाच शिल्लक मालाची मोजदाद आणि त्यांची कोडिंग, बारकोडिंगही सध्या करावी लागते आहे. मालाचे उत्पादन अगोदरचे असले, तरी त्यांची विक्री आता जीएसटीच्या माध्यामातून करावी लागणार आहे. त्यासाठी नव्याने हे काम करण्यात येत आहे.  

Web Title: aurangabad news GST