ऑटोमोबाईल क्षेत्रात 49 कोटींची उलाढाल 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

औरंगाबाद - नोटाबंदी, जीएसटीनंतर बाजारपेठेत आलेली मंदीची लाट काही प्रमाणात ओसरताना दिसून येत आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या मुहूर्तावर शहरात चारचाकी आणि दुचाकी क्षेत्रात 49 कोटींची उलाढाल झाली. यात रविवारी (ता. 18) 625 चारचाकी आणि बाराशे दुचाकींची विक्रमी विक्री झाली. 35 हून अधिक नागरिकांनी या मुहूर्तावर गृहप्रवेश केला असल्याची माहिती बांधकाम व्यावसायिकांनी दिली. 

औरंगाबाद - नोटाबंदी, जीएसटीनंतर बाजारपेठेत आलेली मंदीची लाट काही प्रमाणात ओसरताना दिसून येत आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या मुहूर्तावर शहरात चारचाकी आणि दुचाकी क्षेत्रात 49 कोटींची उलाढाल झाली. यात रविवारी (ता. 18) 625 चारचाकी आणि बाराशे दुचाकींची विक्रमी विक्री झाली. 35 हून अधिक नागरिकांनी या मुहूर्तावर गृहप्रवेश केला असल्याची माहिती बांधकाम व्यावसायिकांनी दिली. 

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घर, वाहन आणि सोने-चांदी घेणे शुभ मानले जाते. याच मुहूर्तावर दरवर्षी विविध क्षेत्रांत कोट्यवधींची उलाढाल होते. गेल्या दीड वर्षापासून नोटाबंदी, जीएसटी, रेरा आणि विविध क्षेत्रांवर लादण्यात आलेल्या विविध अटींमुळे बाजारपेठ ठप्प होती. यामुळे बाजारपेठेतील छोटे उद्योग बंद पडले; मात्र दिवाळीपासून बाजारपेठ काही प्रमाणात पूर्ववत झाली. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ऑटोमोबाईल क्षेत्रात मंदीनंतरही मोठी उलाढाल झाली. 

चारचाकी 
ऑटोमोबाईल क्षेत्रात रविवारी 625 चारचाकी वाहनांची विक्री झाली. गेल्या आठवडाभरापासून चारचाकी वाहनांची विचारणा झाली होती. यातून 43 कोटी 75 लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. यासाठी विविध कंपन्यांनी विविध ऑफर्स दिल्या होत्या. यात एक लाख रुपयांपर्यंत सूट होती; तर प्रीमियम वाहनांसाठी व्याजदर कमी करण्यात आला होता, अशी माहिती विकास वाळवेकर यांनी दिली. 

दुचाकी 
शहरातून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर एक हजार 200 दुचाकींची विक्री झाली आहे. यातून एकट्या "रत्नप्रभा'तून 200 वाहने विक्री झाली. शहरातभरातून दुचाकीच्या विक्रीतून 6 कोटींची उलाढाल झाली असल्याची माहिती मनोज पवार यांनी सांगितले. 

सोने-चांदी 
बाजारपेठेत सोने-चांदीने विक्रीसाठी आता उसळी घेतली आहे. सोने-चांदीच्या विक्रीत गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारपासून गर्दी झाली. पाडव्यापासून 60 ते 70 टक्‍के उलाढाल शहरभरात झाली आहे. पाडव्यापासून लग्नसराईसाठी ही उलाढाल वाढेल, अशी माहिती उदय सोनी यांनी दिली. 

बांधकाम 
नोटाबंदी, जीएसटी आणि रेरामुळे हैराण झालेल्या बांधकाम क्षेत्रातही काहीसे नवचैतन्याचे वातावरण दिसून आले. पाडव्याच्या मुहूर्तावर शहरातील "क्रेडाई'च्या बांधकाम व्यावसायिकांकडे दीडशे बुकिंग झाली; तर इतर व्यावसायिकांकडे 50 हून अधिक घरांची बुकिंग झाली आहे. यात पंधराहून अधिक लोकांनी गृहप्रवेश केला. "क्रेडाई'च्या विविध बिल्डरकडे मोठ्या प्रमाणावर विचारणा झाली असल्याची माहिती "क्रेडाई'चे अध्यक्ष रवी वट्टमवार यांनी सांगितले. 

इलेक्‍ट्रॉनिक्‍स 
इलेक्‍ट्रॉनिक्‍स क्षेत्रावर मात्र संक्रांत कोसळली. दोन दिवसांतील वातावरणातील बदलामुळे एसी आणि कूलरची विक्री पूर्णपणे ठप्प झाली. इतर वस्तूंवरही परिणाम दिसून आला. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पाडव्याला केवळ 50 टक्‍केच उलाढाल झाली, अशी माहिती पंकज अग्रवाल यांनी दिली.

Web Title: aurangabad news gudhipadwa