दुचाकींतून मोठी उलाढाल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 मार्च 2018

औरंगाबाद -  दिवाळीनंतर गुढीपाडवा हा महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी नवीन वस्तू, सोने, घर, वाहन खरेदी केली जाते; मात्र गेल्यावर्षीच्या गुढीपाडव्याप्रमाणे यंदाही बाजारपेठेवर मंदीचे सावट असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शहरातून दीड हजारांहून अधिक दुचाकींची बुकिंग झाली. शिवाय दोनशेहून अधिक घरांची विक्री होईल, असा अंदाज क्रेडाईने व्यक्‍त केला. 

औरंगाबाद -  दिवाळीनंतर गुढीपाडवा हा महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी नवीन वस्तू, सोने, घर, वाहन खरेदी केली जाते; मात्र गेल्यावर्षीच्या गुढीपाडव्याप्रमाणे यंदाही बाजारपेठेवर मंदीचे सावट असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शहरातून दीड हजारांहून अधिक दुचाकींची बुकिंग झाली. शिवाय दोनशेहून अधिक घरांची विक्री होईल, असा अंदाज क्रेडाईने व्यक्‍त केला. 

नोटाबंदी आणि जीएसटीनंतर बाजारपेठेत मंदीची लाट निर्माण झाली आहे. सरकारतर्फे बाजारपेठेतील प्रत्येक क्षेत्रात नवनवीन नियम लादण्यात येत असल्यामुळे छोटे व्यवसाय बंद पडले, तर मोठ्या व्यावसायिकांना तग धरण्यासाठी धडपड करावी लागत आहे. मात्र, सणासुदीच्या काळात खरेदी वाढून  बाजारपेठेला चालना मिळते. दिवाळीला सोने-चांदी, वाहन, रिअल इस्टेट, कपडा मार्केट, हॉटेल व्यवसाय, किराणा सामान, इलेक्‍ट्रॉनिक्‍स क्षेत्रांत जोरदार उलाढाल झाली. त्यामध्ये नोटाबंदीपूर्वीचा उत्साह नसला तरी प्रत्येक सणाला बाजारपेठेतील उलाढाल वाढेल, याच प्रयत्नात व्यापारी आहेत. मराठी नववर्षाच्या सुरवातीला घर, वाहन आणि सोने खरेदीला अधिक महत्त्व असते. त्यामुळे साडेतीन मुहूर्तांपैकी असणारा एक गुढीपाडवा कोट्यवधींची उलाढाल करेल, अशी अपेक्षा आहे. गेल्या वर्षी अडीच हजार दुचाकींची विक्री पाडव्याला झाली होती. यंदा केवळ दीड हजार दुचाकींचे बुकिंग झाले आहे. यासह चारचाकींचीही विक्रमी विक्री झाली होती. त्यातही यंदा घट दिसून येत आहे. 

बांधकाम क्षेत्र 
नोटाबंदी, जीएसटी आणि रेरामुळे बाधकाम क्षेत्रात काहीसे मंदीचे सावट दिसून आले. गेल्या पंधरा दिवसांपासून घरासंबंधीची विचारण वाढली आहे. शहरात सुरू असलेल्या विविध साईडवर ग्राहक भेटी देत आहेत. स्वतःच्या मालकीच्या घरावर गुढी उभारण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या पाडव्याला १०० ते दोनशे घरांची विक्री अपेक्षित आहे. पाडव्यानिमित्त विविध आकर्षक ऑफर देण्यात येत आहेत, असे क्रेडाईतर्फे सांगण्यात आले. 

ऑटोमोबाईल्स 
गेल्या वर्षी गुढीपाडव्याला ५०० ते ६०० चारचाकी वाहनांची विक्री झाली होती; मात्र यंदा या क्षेत्रात मंदी आहे. कंपन्यांतर्फे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर्स दिल्या जात आहेत. या वेळी ही संख्या जवळपास अर्ध्यावर येण्याची शक्‍यता आहे. यंदाचा व्यवसाय दहा टक्‍के कमी असण्याची शक्‍यता नाकारता येत नसल्याची माहिती चारचाकी वाहन विक्रेत्यांतर्फे सांगण्यात येत आहे.

इलेक्‍ट्रॉनिक्‍स 
पाडव्याच्या पार्श्वभूमीवर इलेक्‍ट्रॉनिक्‍समध्येही दोनशे कोटींपर्यंत उलाढाल होणे अपेक्षित आहे. यंदा ग्राहकांसाठी विशेष ऑफर देण्यात आलेल्या आहेत. असे इलेक्‍ट्रॉनिक्‍स विक्रेत्यांतर्फे सांगण्यात आले.

सोने-चांदी 
बाजारपेठ पूर्वपदावर आल्यानंतर सोने-चांदीच्या दरातही चढ-उतार पाहायला मिळाले. सोन्याचे दर कमी झाल्यानंतर खरेदी वाढणे अपेक्षित असतानाही तसे झाले नाही; मात्र गुढीपाडव्याला सोने खरेदीत वाढ होण्याची शक्‍यता आहे. यंदा १५ ते १६ कोटी रुपयांची उलाढाल होईल, असा अंदाज सराफा असोसिएशतर्फे व्यक्‍त केला जात आहे.

Web Title: aurangabad news gudhipadwa two wheeler