निराधार मनोरुग्णांच्या चेहऱ्यावर ‘स्माईल’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

औरंगाबाद - शहरातील विविध भागांतील रस्ते, दुभाजकांवर विदारक परिस्थितीत जीवन व्यतित करणाऱ्या पन्नास निराधार मनोरुग्णांना ‘स्माईल प्लस’ सोशल फाउंडेशनने रविवारी (ता. २८) मदतीचा हात दिला. योगेश मालखरे या तरुणाने त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी उचलून शहराला निराधार मनोरुग्णमुक्त करण्याचा निर्धार केला. त्याअनुषंगाने ‘माणुसकीची फेरी’ काढण्यात आली. त्याला तरुणाईने उदंड प्रतिसाद दिला. 

राज्याच्या विविध कानाकोपऱ्यांतून या फेरीसाठी युवक-युवती सकाळी नऊ वाजेपासून क्रांती चौकात जमले होते. स्माईल प्लस फाउंडेशनच्या सदस्यांनी शहरातील विविध भागांतून निराधार मनोरुग्णांना एकत्र करीत व्यासपीठासमोर सन्मानाने बसवले. या उपक्रमाला महापालिका मदत करायला तयार असल्याचे आश्‍वासन महापौर नंदकुमार घोडेले यांनी या वेळी दिले. महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनीही स्माईल प्लसचे कौतुक करीत मदतीची ग्वाही दिली. 

कार्यक्रमाला उपमहापौर विजय औताडे, महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर, स्माईल फाउंडेशनचे संस्थापक मालखरे, रमा मालखरे, फैजल खान, इरफान खान, शेख हबीब, गजानन सरोदे, पोलिस उपनिरीक्षक देशमुख, नगरसेविका कीर्ती शिंदे, निमिषा धारूरकर, सुमित खांबेकर, विशाल खंडागळे, किशोर वाघमारे यांच्यासह तरुणांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

निराधारांना नेणार पुण्याला
या फेरीच्या माध्यमातून शहरातील विविध भागांतील निराधार मनोरुग्णांना अंघोळ घालून त्यांची स्वच्छता करण्यात आली. आता त्यांना पुण्याला नेऊन त्यांचे पुनर्वसन केले जाणार आहे, अशी माहिती मालखरे यांनी दिली. दरम्यान, या फेरीचे फेसबुक लाईव्ह करण्यात आले होते. त्याला नेटीझन्सनी मोठा प्रतिसाद दिला. 

Web Title: aurangabad news helpless psycho people