जालना रोडच्या फायलीची दिल्लीत लोळण

जालना रोडच्या फायलीची दिल्लीत लोळण

औरंगाबाद - सर्वसामान्य औरंगाबादकरांसाठी जिव्हाळ्याचा मुद्दा असलेल्या जालना रोडचा प्रश्‍न घोषणा झाल्याच्या दोन वर्षांनंतरही मार्गी लागलेला नाही. मोठ्या झपाट्याने औरंगाबादेतील भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या कार्यालयाने सगळे सोपस्कार पूर्ण केल्याचा परिणाम शून्य झाला. जालना रोड आणि बीड बायपास कामाच्या निविदा प्रक्रियेसाठी सज्ज असूनही दिल्ली दरबारी अनेक महिन्यांपासून लोळण घेत आहेत.

राज्यात दीड लाख कोटींचे रस्ते बांधण्याची घोषणा करतानाच औरंगाबादेत बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शहराची लाइफलाइन असलेले जालना रोड आणि बीड बायपास रस्ता बांधून देण्याचीही घोषणा केली होती. २५ डिसेंबर २०१५ ला झालेल्या एका कार्यक्रमात श्री. गडकरी यांनी औरंगाबादेतील पत्रकारांना उद्देशून सांगितले होते, की ‘मी सांगितलेल्या घोषणा पूर्ण झाल्या नाहीत तर तुम्ही जी शिक्षा द्याल ती भोगायला मी तयार आहे.’ या घोषणेनंतर औरंगाबादेतील कार्यालयाने या मार्गांचे तत्काळ सर्वेक्षण करून त्याचा प्रकल्प अहवाल तयार केला होता. हा प्रकल्प अहवाल आता दिल्लीवासी होऊन सहा महिने उलटले आहेत. निविदा प्रक्रियेसाठी सज्ज असलेली ही फाइल मात्र आता धुळीच्या ओझ्याखाली दबत चालली     आहे.  भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या कार्यालयाने मधल्या काळात या प्रकल्पाबाबत दाखविलेल्या उदासीनतेचे फटके आता औरंगाबादकरांना सोसावे लागत आहेत. सध्या ऱ्हास सुरू असला, तरी तो किती काळ चालणार याचे उत्तर आता सामान्य औरंगाबादकर मागत आहेत. लाखो वाहनांचा भार वाहणारा हा मार्ग ‘वाहतूक कोंडी’मुक्त करू पाहणारा हा प्रकल्प हाती न घेतला गेला तर अपघातांची संख्या वाढेल.

सध्या वाली कोण?
शहराचा भार वाहणाऱ्या जालना रोडला सध्या वाली कोण? याचे उत्तर कोणीच द्यायला तयार नाही. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हा रस्ता होता; पण जालना रोड आणि बीड बायपासचे काम ‘एनएचआयए’ करणार असल्याची घोषणा होताच या कार्यालयांनी एक टोपलेही डांबर येथे टाकलेले नाही. तिजोरीत कायम खडखडाट असल्याने महापालिका येथे खड्डे बुजविण्यासाठी पुढाकार घेत नाही.

बायपासवर किती अपघात बघायचे?
बीड बायपास गेल्या अनेक दिवसांपासून वाहतुकीच्या कोंडीपेक्षा अपघातांबाबतच चर्चेत आहे. दोन्ही बाजूंना दाट नागरी वसाहती असल्यामुळे बायपासवर दुचाकी आणि तीनचाकी वाहनांची संख्या वाढत चालली आहे. अपघात झाल्यावर दिवस, दोन दिवस सर्व्हिस रोडची चर्चा झडण्यापलीकडे अद्याप काहीही झालेले नाही.

रस्ते वगळण्याचे नसते उद्योग 
‘भारतमाला’ प्रकल्पाचा रस्ता अजिंठा येथून सुरू होतो आणि पैठणपर्यंत जातो. शहरातून जाणाऱ्या या रस्त्यावर तब्ब्ल ९३९ खड्डे पडल्याचे ‘सकाळ’च्या पाहणीत निदर्शनास आले होते. शहराच्या बाहेरून येणारा हा रस्ता शहरातून जिल्हाधिकारी कार्यालय, मिलकॉर्नर, रेल्वेस्टेशनमार्गे पैठणकडे जातो; पण शहराचा भाग असलेला रस्ता स्थानिक लोकप्रतिनिधींना अंधारात ठेवत वगळण्याचे नसते उद्योग औरंगाबादेतून झाले होते. त्यामुळे व्हीआयपी रोडचे भविष्यही अधांतरीच राहिले आहे.

रस्त्याची लागली ‘वाट’
जुने, नवे औरंगाबाद, चिकलठाणा आणि वाळूज औद्योगिक वसाहती व अन्य ठिकाणांची जोडणी करणारा जालना रोड शहराची लाइफलाइन आहे. जुन्या डांबरी रस्त्याचे काम गेली अनेक वर्षे केवळ ठिगळे लावून भागविले जात आहे. ठिगळे आणि त्याच ठिकाणी खड्डे आता नागरिकांना असहाय होत असल्याने जालना रोडचा प्रवास हा डोकेदुखी ठरत आहे. अनेक ठिकाणांचा डांबरी थर पाण्यात वाहून गेला असून, पुन्हा डांबरीकरणही फार काळ टिकणारे नाही. 

हे आहे डीपीआरमध्ये...
केंब्रिज शाळा ते नगर नाका आणि झाल्टा फाटा ते महानुभाव आश्रम यादरम्यानच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण.
पादचारी मार्ग, पथदिवे, प्रवाशांसाठी थांबे, ट्रॅफिक अँड पोस्ट, मेडिकल अँड पोस्ट, व्हेकल रेस्क्‍यू पोस्ट आदी. 
बाबा पेट्रोलपंप, होलीक्रॉस शाळा, झाल्टा फाटा, देवळाई चौक, बजाज रुग्णालय, महानुभाव आश्रम चौकात पादचारी पूल. 
हायमास्टची सुविधा, सोलारवर चालणारे पथदिवे. 
७.८ किमी (जालना रोड), ३०.३२ किमीचे (बीड बायपास) स्लीप रोड. 
बस शेल्टर ः जालना रोड - नगर नाका, होलीक्रॉस शाळा, बाबा पंप, सत्र न्यायालय, क्रांती चौक, अमरप्रीत चौक, आकाशवाणी चौक, सेंट फ्रान्सिस शाळा असे एकूण १६ बसथांबे. बीड बायपास ः झाल्टा फाटा, गांधेली रोड, बाळापूर रोड, मुकुंदवाडी रोड, देवळाई, सातारा गाव फाटा, महानुभाव आश्रम. 

काय म्हणाले होते गडकरी... (केंब्रिज शाळेजवळील मैदान, २५ डिसेंबर २०१५)

तुमच्या एका मराठी वर्तमानपत्रात मी वाचले आहे, गडकरी घोषणा करून राहिले आहेत. 

मी, पत्रकार बंधूंना विनंती करेन, माझी एक-एक घोषणा आपल्या डायरीत लिहून ठेवा आणि एकही घोषणा पूर्ण झाली नाही तर तुम्ही जी शिक्षा द्याल ती भोगायला मी तयार आहे. मी खोटे आश्वासनं कधी देत नाही. जे होण्यासारखे असेल तेच सांगेन आणि खरोखर या देशात काम करण्यासाठी पैशांची कमी नाही, तर इच्छाशक्तीची कमी आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये दीड लाख कोटी रुपयांचे रस्ते मी माझ्या पाच वर्षांच्या कार्यकाळात बांधायचे ठरवले आहे. पण तुम्ही दरवेळा हे वाढवत नेता. अतुल सावे आले, म्हणाले, औरंगाबादचे रस्ते खराब आहेत, आज तुमच्या चिकलठाण्यापासून ते नगर नाक्‍यापर्यंत, ही जी लेंथ आहे १४ किलोमीटरची, हा सगळा रस्ता सिमेंट-काँक्रिटचा ४०० कोटी रुपये खर्चून करून देण्याचे आम्ही ठरवले आहे. मग ते आले बीड बायपासला, या ९.६ किलोमीटरच्या रस्त्यासाठी २५० कोटी मंजूर केले आहेत. आता हरिभाऊ बागडे म्हणतात, २ पूल बांधा, म्हणलं या रस्त्यावर असेल तर तेही बांधून देईन... 

त्यांचे हे भाषण https://youtu.be/e1QdghiUkio या लिंकवर पाहू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com