घे पंगा... कबड्डीतील दम रविवारपासून दिसणार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

प्रवेशिकांसाठी संपर्क 
१) विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा 
योगेश जाधव, ए. जे. स्पोर्ट सचिव - ८९७५६०३१०५ 
२) ‘सकाळ’ कार्यालय, सिडको टाऊन सेंटर 
ऐश्‍वर्या शिंदे, यिन समन्वयक - ७०२८०२६४७७

औरंगाबाद - मातीत दमाची परीक्षा घेणारा खेळ म्हणून परिचित असलेल्या कबड्डीतील दम रविवार (ता. २१) पासून विभागीय क्रीडा संकुलात दिसणार आहे. घे पंगा... म्हणत खेळाडू आपला दम दाखवत प्रतिस्पर्धी संघांना पराभूत करण्यासाठी मैदानात उतरतील. 

‘सकाळ’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) आणि ए. जे. स्पोर्टस असोसिएशनतर्फे प्रो-कबड्डी चॅंपियन्स लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १६८ खेळाडू आणि त्यांचे होणारे सामने स्पर्धेत रंग भरणारे ठरणार आहेत. 

स्पर्धा केवळ चाचणीपुढे आलेल्या खेळाडूंना एकत्रित करून लढवली जाणार नाही, तर त्यात खेळाडूंच्या गुणांचे पैलू पाडण्याचे काम सरावाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. सराव शिबिरे आता अंतिम टप्प्यात आली आहेत. सरावातून कसून तयार झालेले खेळाडू आता सामने लढण्यासाठी सज्ज झाले आहेत. १२ संघांमध्ये रंगणाऱ्या या द्वंद्वात उतरण्यासाठी सर्वच संघांची जय्यत तयारी झाली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या हस्ते २१ जानेवारीला दुपारी एक वाजता स्पर्धेचे उद्‌घाटन होईल. पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह आमदार, ज्येष्ठ खेळाडूंच्या उपस्थितीत स्पर्धा खेळवली जाणार आहे. विजेत्या संघाला तब्बल दीड लाखाचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे. याशिवाय वैयक्तिक बक्षिसेही देण्यात येणार आहेत. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अशोक जाधव, दादासाहेब जाधव, योगेश नामदेव जाधव यांचा चमू कार्यरत आहे. अक्षय जायभाय, साईनाथ गिधाने, कल्याण जाधव, ज्ञानेश्वर इथापे यांचे सहकार्य लाभत आहे. 

Web Title: aurangabad news kabaddi

टॅग्स