कबड्डी... कबड्डी.... कबड्डी...!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

प्रवेशिकांसाठी संपर्क 
१) विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा 
योगेश जाधव, ए. जे. स्पोर्ट सचिव - ८९७५६०३१०५ 
२) ‘सकाळ’ कार्यालय, सिडको टाऊन सेंटर 
ऐश्‍वर्या शिंदे, यिन समन्वयक - ७०२८०२६४७७

औरंगाबाद - देशातील कबड्डीला लीग स्पर्धांनी ग्लॅमर दिले, त्यानुसारच आयोजित करण्यात येणाऱ्या प्रो-कबड्डी चॅम्पियन्स लीग स्पर्धेची उत्कंठा आता शिगेला पोचली आहे. कबड्डीपटूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी रविवार (ता. २१) पासून ‘सकाळ’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) आणि ए. जे. स्पोर्टस्‌ असोसिएशनतर्फे प्रो-कबड्डी चॅंपियन्स लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  

स्पर्धेत एकूण १६८ खेळाडू एकमेकांशी विजेतेपदासाठी दोन हात करतील. ही स्पर्धा केवळ खेळाडूंना एकत्रित करून लढविली जाणार नाही, तर त्यात खेळाडूंच्या गुणांना पैलू पाडण्याचे काम सरावाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या सरावासाठी लावण्यात आलेली निवासी शिबिरे शहराच्या अनेक भागात सध्या सुरू आहेत. या शिबिरातून खेळाडूंच्या गुणांना तर वाव मिळतो आहेच; पण हे गुण त्यांचे स्पर्धेतील बलस्थाने ठरणार आहेत. १२ संघांमध्ये रंगणाऱ्या या द्वंद्वात उतरण्यासाठी सर्वच संघ जय्यत तयारीला लागले आहेत. स्पर्धा पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींकरिता प्रवेशिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. व्यावसायिक स्पर्धांच्या धर्तीवर आयोजित या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी एकापेक्षा एक १६८ खेळाडू निवडले आहेत. स्पर्धेत एकूण २० सामने खेळविण्यात येणार आहेत. ज्यातून विजेता ठरणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या हस्ते २१ जानेवारीला दुपारी एक वाजता स्पर्धेचे उद्‌घाटन होईल. पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह आमदार, ज्येष्ठ खेळाडूंच्या उपस्थितीत स्पर्धा खेळविली जाणार आहे. 

विजेत्या संघाला तब्बल दीड लाखाचे रोख, उपविजेत्या संघाला एक लाख रुपये, तृतीय स्थान पटकाविणाऱ्या संघाला जिल्हा परिषद बांधकाम व अर्थ समिती सभापती विलास भुमरे यांच्यातर्फे तब्बल ७५ हजार रुपये बक्षीस म्हणून दिले जाणार आहे. शिवाय प्रत्येक सामन्यात बेस्ट डिफेंडर, सुपर टेल, हायफाय डिफेंडर आणि सुपर मूव्हसाठी रोख बक्षिसेही दिली जाणार आहेत. 

Web Title: aurangabad news Kabaddi YIN