कबड्डीच्या डावांचा आजपासून थरार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जानेवारी 2018

प्रवेशिकांसाठी संपर्क 
1. विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा. योगेश जाधव, सचिव- ए. जे. स्पोर्ट - 8975603105 
2. सकाळ कार्यालय, सिडको टाऊन सेंटर ः ऐश्‍वर्या शिंदे, "यिन' समन्वयक ः 7028036477 

औरंगाबाद - शक्ती, स्फूर्ती आणि वेगाचा खेळ म्हणून परिचित असलेल्या कबड्डीचे डाव रविवार (ता. 21) पासून विभागीय क्रीडा सुंकलात पाहायला मिळणार आहेत. 12 संघांदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेचा शुभारंभ रविवारी दुपारी एकला खासदार तथा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याहस्ते होणार आहे. 

"सकाळ'च्या "यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन) आणि ए. जे. स्पोर्टस्‌ असोसिएशनतर्फे प्रो-कबड्डी चॅंपियन्स लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. बारा संघांचे 168 खेळाडू पाच दिवस मैदान गाजविणार आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील तालुकानिहाय संघ निवडून त्यांच्या डावांवर मेहनत घेत प्रशिक्षकांनी 12 संघ तयार केले आहेत. रविवारपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेचे उद्‌घाटन दुपारी एकला होणार आहे. पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हा परिषदेचे सभापती विलास भुमरे, जिल्हा परिषद सदस्य अक्षय जायभाय आदींची उपस्थिती राहणार आहे. या उद्‌घाटन सोहळ्यानंतर चार सामने विभागीय क्रीडा संकुलावर रंगणार आहेत. पहिल्या दिवशी चार सामने खेळविण्यात येणार असून, यात संघांची दमदार कामगिरी पाहायला मिळणार आहे. डाव आडाखे, प्रतिस्पर्धी संघांचे खेळाडू बाद करण्याच्या क्षमता या निमित्ताने पाहायला मिळणार आहेत. हा थरार पाहण्याची संधी औरंगाबादच्या क्रीडाप्रेमींना मिळणार आहे. विजेत्याला दीड लाखांचे बक्षीस प्रदान करण्यात येणार आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ए. जे. स्पोर्टस्‌ असोसिएशनचे अध्यक्ष अशोक जाधव, दादासाहेब जाधव, योगेश जाधव, ऐश्‍वर्या शिंदे यांचा चमू कार्यरत आहे. साईनाथ गिधाने, कल्याण जाधव, ज्ञानेश्वर इथापे यांचे सहकार्य लाभत आहे. 

मॅटवर होणार सामने 
जिल्ह्यातील कबड्डीला व्यावसायिक रूप देण्यासाठी, आधुनिकतेची कास धरण्यासाठी या स्पर्धा मॅटवर खेळविण्यात येणार आहेत. मॅटवरील स्पर्धा खेळण्याचा अनुभव भविष्यात व्यावसायिक स्पर्धा खेळण्यासाठी मोठ्या फायद्याचा ठरणार आहे. मॅटवरच राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सामने खेळविले जात असल्याने हा अनुभव खेळाडूंना आपली कारकीर्द घडविण्यासाठी फायद्याचा ठरणार आहे. 

Web Title: aurangabad news kabaddi yin