एलईडी पथदिव्यांनी उजळणार मुख्य रस्ते

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

औरंगाबाद - एलईडी प्रकल्पाअंतर्गत पहिल्या टप्प्यात मुख्य रस्त्यांवरील दहा हजार पथदिवे बसविण्यात येणार आहेत, तसेच पथदिवे देखभाल दुरुस्तीसाठी कंत्राटदारांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात येणार आहे, असे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी गुरुवारी (ता. ११) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सांगितले. 

औरंगाबाद - एलईडी प्रकल्पाअंतर्गत पहिल्या टप्प्यात मुख्य रस्त्यांवरील दहा हजार पथदिवे बसविण्यात येणार आहेत, तसेच पथदिवे देखभाल दुरुस्तीसाठी कंत्राटदारांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात येणार आहे, असे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी गुरुवारी (ता. ११) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सांगितले. 

बैठकीत पथदिव्यांची दुरुस्ती होत नसल्याची तक्रार सदस्य राज वानखेडे यांनी केली. त्यानुसार सभापती गजानन बारवाल यांनी विद्युत विभागाचे उपअभियंता के. डी. देशमुख यांना खुलासा करण्याची सूचना केली. त्यांनी पथदिवे दुरुस्तीसाठी देण्यात आलेले कंत्राट डिसेंबर महिन्यात संपले आहे. नवीन निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. त्यावर वानखेडे यांच्यासह सर्वच सदस्य आक्रमक झाले. राजू वैद्य यांनी सहा-सहा महिने पथदिव्यांच्या दुरुस्तीच्या फायली दाबून ठेवल्या जात असल्याचा आरोप केला. त्यावर श्री. देशमुख यांनी एलईडी प्रकल्पातून दुरुस्तीची कामे होणार असल्याचे सांगितले.

मात्र नगरसेवक आक्रमक झाल्याने शहर अभियंता श्री. पानझडे यांनी खुलासा केला. ते म्हणाले, पथदिव्यांच्या दुरुस्तीच्या संदर्भात विद्युत विभागाने दिरंगाई केली. याबाबत समज देण्यात आली आहे. पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी २२ कंत्राटदार नियुक्त असून, त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिली जाईल. तसेच एलईडीच्या कामांना सुरवात झाली असून, पहिल्या टप्प्यात दहा हजार एलईडीचे दिवे मुख्य रस्त्यांवर कंत्राटदाराकडून बसविले जाणार आहेत. त्यांच्या दुरुस्तीचे कामही त्यांच्याकडेच राहील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ४० हजार एलईडी पथदिवे लावले जातील, असे पानझडे यांनी सांगितले.

वायरअभावी काम रखडले 
शंभर फुटांचे वायर नसल्याने आपल्या वॉर्डातील ५० पथदिवे बंद असल्याची तक्रार यावेळी सीताराम सुरे यांनी केली. त्यावर तातडीने दखल घेण्याची सूचना सभापतींनी केली. 

Web Title: aurangabad news led lamp on main road