बाजारपेठेतही गोडवा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जानेवारी 2018

औरंगाबाद - नोटाबंदी आणि ‘जीएसटी’मुळे २०१७ वर्ष चांगलेच गाजले. या दोन्ही निर्णयांमुळे बाजारपेठा थंडावल्या होत्या. बाजारपेठा रुळावर आणण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या. त्यानंतर हळूहळू बाजारपेठ फुलू लागली आहे. नववर्षात ऑटोमोबाईल क्षेत्रात तीन ते चार टक्‍क्‍यांनी किमती वाढूनही तीस कोटींची उलाढाल झाली आहे. मकर संक्रांतीच्या निमित्त बाजारपेठेतही गोडवा येत असल्याच्या प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी दिल्या. 

औरंगाबाद - नोटाबंदी आणि ‘जीएसटी’मुळे २०१७ वर्ष चांगलेच गाजले. या दोन्ही निर्णयांमुळे बाजारपेठा थंडावल्या होत्या. बाजारपेठा रुळावर आणण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या. त्यानंतर हळूहळू बाजारपेठ फुलू लागली आहे. नववर्षात ऑटोमोबाईल क्षेत्रात तीन ते चार टक्‍क्‍यांनी किमती वाढूनही तीस कोटींची उलाढाल झाली आहे. मकर संक्रांतीच्या निमित्त बाजारपेठेतही गोडवा येत असल्याच्या प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी दिल्या. 

गेल्यावर्षी पासून देशभरात वस्तू आणि सेवाकर प्रणाली (जीएसटी) लागू करण्यात आली. या प्रणालीचा बाजारपेठेवर मोठा परिणाम जाणवला. नोटाबंदी, ‘जीएसटी’नंतर आलेल्या प्रत्येक सणाला बाजारपेठेतील प्रतिसाद हा किरकोळ होता. या मंदीतून बाहेर येण्यासाठी व्यापाऱ्यांतर्फे हालचाली सुरू आहेत; मात्र त्यांना अद्यापही पुरेसे यश आलेले नाही. आता व्यापारी स्वत:च पुढाकार घेत यातून बाहेर येत आहेत. नव्या वर्षात एक जानेवारीला चारचाकी घेणाऱ्यांची संख्या मोठी होती. शहरात १३ जानेवारीपर्यंत तब्बल तीस कोटींची उलाढाल झाली आहे. नव्या वर्षात चारचाकीच्या किमती वाढूनही दुचाकी आणि चारचाकी घेण्यासाठी विचारणा होत असल्याचे ऑटोमोबाईल विक्रेत्यांनी सांगितले.

 किराणा बाजारपेठ
बाजारपेठेत किराणामध्ये अत्यावश्‍यक वस्तू सोडता इतर वस्तूंची गरजेपुरती खरेदी होत आहे. मकर संक्रांतीनिमित्त दरवर्षी तीळ आणि गुळाची मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात येते. यंदा रेडिमेड तीळगूळ खरेदी होत असल्यामुळे तिळाची विक्री गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी झाली आहे. यंदा तीस टक्‍केच उलाढाल झाली आहे. तर गुळाची दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठी मागणी असल्याची माहिती संजय कांकरिया यांनी दिली.

 ऑटोमोबाईल
नववर्षात दुचाकी आणि चारचाकींची पहिल्या दिवशी मोठ्या प्रमाणावर बुकिंग झाली होती. नव्या वर्षात प्रत्येक शो-रूमला पाच ते सात चारचाकी वाहनांची बुकिंग झाली. कंपन्यांच्या वेगवेगळ्या ऑफर्स असल्यामुळे ग्राहकांना ही मोठी संधी आहे. औरंगाबाद शहरात ऑटोमोबाईल क्षेत्रात तीस कोटींची उलाढाल झाली आहे, अशी माहिती विकास वाळवेकर यांनी दिली.

ऑफर्सचा वर्षाव 
बाजारपेठेतून गायब झालेला ग्राहक परत आणण्यासाठी कंपन्यांतर्फे विविध ऑफर्स देण्यात येत आहेत. यात चारचाकीमध्ये २०१७ मधील स्टॉकवरही भरघोस सूट देण्यात येत आहे. याचप्रमाणे इलेक्‍ट्रॉनिक्‍समध्येही एसी, वॉशिंग मशीन, एलईडी यांची मागणी वाढली आहे. यातही दहा हजार रुपयांपासून ऑफर्स आहेत. यासह बॅंकॉक व दुबई परदेशी वारी आणि यासह साडेचार टक्‍के कॅशबॅक अशा अनेक ऑफर्स इलेक्‍ट्रॉनिक्‍समध्ये सध्या सुरू आहेत, अशी माहिती पंकज अग्रवाल यांनी दिली.

Web Title: aurangabad news makar sankranti