मनमाड-मुदखेड मार्गाचे होणार विद्युतीकरण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

नांदेड - मनमाड - मुदखेड या ७८० किलोमीटर मार्गाच्या विद्युतीकरणास दक्षिण - मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाला अखेर मान्यता मिळाली आहे. यावर्षीचा हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतल्याची माहिती दक्षिण - मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांनी गुरुवारी (ता. ११) पत्रकार परिषदेत दिली. राजधानी एक्‍स्प्रेस नांदेडपर्यंत वाढविण्यासाठी सकारात्मक असल्याचेही ते म्हणाले.

रेल्वेच्या नांदेड विभागांतर्गत येणाऱ्या सर्वपक्षीय खासदारांची बैठक झाली. बैठकीतील निर्णय आणि चर्चेची माहिती यादव यांनी दिली. बैठकीला नांदेडचे खासदार अशोक चव्हाण, हिंगोलीचे ॲड. राजीव सातव, परभणीचे संजय जाधव, अकोल्याचे संजय धोत्रे, औरंगाबादचे चंद्रकांत खैरे, अदिलाबादचे पी. नागेश उपस्थित होते. 

यादव म्हणाले, की ‘दक्षिण - मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडे आमचे सतत लक्ष आहे. या विभागात प्रवाशांना सुरक्षित प्रवास देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. या विभागात लोहमार्ग दुहेरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मनमाड - मुदखेड या मार्गाच्या विद्युतीकरणाला रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली आहे. हे काम यावर्षी सुरू करून येत्या चार वर्षांत पूर्ण केले जाईल. नांदेड - बिदर या नव्या मार्गाचे सर्वेक्षण करून नोव्हेंबर २०१७ मध्येच रेल्वे बोर्डाकडे पाठविले आहे. या विभागातील अनेक प्रलंबित उड्डाणपुलांचे काम हाती घेण्यात येत असून यासाठी राज्य सरकारने पन्नास टक्के खर्च उचलला आहे.’ 

मनमाड - मुंबई राजधानी एक्‍स्प्रेस नांदेडपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. नांदेड - पनवेल गाडीला जादा डबा जोडण्यास आमची काही हरकत नाही; परंतु मुंबईला ज्या ट्रॅकवर ही रेल्वे थांबते तो ट्रॅक कमी डब्यांचा आहे; तसेच देशातून सर्वच भागांतून मुंबईला गाड्या येतात. यामुळे ट्रॅक मिळणे गरजेचे आहे. नांदेड - मुंबई नव्या गाडीची मागणी केली असून तसा प्रस्ताव रेल्वे बोर्डाला पाठविणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. नांदेड विभागाचे व्यवस्थापक टी. राभा यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Web Title: aurangabad news manmad mudkhed electric railway line