औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चासाठी "ऐतिहासिक' जनजागृती रॅली 

maratha morcha
maratha morcha

औरंगाबाद - कोपर्डी प्रकरणानंतर विविध मागण्या घेऊन मराठा समाजाने राज्यभर ऐतिहासिक मोर्चे काढले; मात्र राज्य सरकारने मागण्यांकडे साफ दुर्लक्ष केल्याने संतप्त मराठा समाजाने मुंबईत 9 ऑगस्ट रोजी क्रांतिदिनी मराठा क्रांती महामोर्चाची हाक दिलेली आहे. या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी (ता. एक) जनजागृतीसाठी काढण्यात आलेली भव्य वाहन रॅली ऐतिहासिक ठरली. यात तरुण, तरुणी, महिला, नागरिकांनी मोठा सहभाग नोंदवला.

मुंबईतील नियोजित महामोर्चाची जोरदार तयारी सुरु आहे. या मोर्चाच्या जनजागृतीसाठी सिडकोतील शिवछत्रपती महाविद्यालयापासून सकाळी दहाला या रॅलीस प्रारंभ झाला. जयभवानीनगर, पुंडलिकनगर, गजानननगर, गजानन महाराज मंदिर, त्रिमूर्ती चौक, आकाशवाणी, क्रांती चौक, पैठण गेट, सिटी चौक, किलेअर्क, जिल्हाधिकारी कार्यालय, टीव्ही सेंटर, बळीराम पाटील विद्यालय, बजरंग चौक, चिश्‍तिया चौक यामार्गाने फेरी मारुन कॅनॉट प्लेस येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. 

मराठा क्रांती मोर्चाला लावलेल्या शिस्तीचा आदर्श ठेवून स्वयंसेवक शांततेचे आवाहन करीत होते. या रॅलीत सर्वात पुढे तरुणी, महिलांचा समावेश होता. त्यांच्यामागे युवक मंडळी, नागरीकांच्या दुचाकी वाहने ठेवली होती. सर्वाच्या वाहनांना, तसेच खिशांना मुंबई मोर्चाची स्टिकर्स लावलेली होती. "एकच चर्चा, मुंबई मोर्चा', "ये रॅली तो झाकी है, मुंबई अभी बाकी है', अशा घोषणांनी रस्ते दणाणून सोडले. सर्व पक्षातील मराठा नेत्यांनी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. 

मुंबई मोर्चात कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी, शेतकरी आणि विद्यार्थी प्रश्‍न, मराठा आरक्षण या प्रमुख मागण्यांबाबत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून इतर मागण्यांची निवेदने मागविण्यात येत आहेत. त्या एकत्रित मागण्या सरकारकडे केल्या जातील. मोर्चाचे नियोजन होण्यासाठी वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. प्रचार, पार्किंग, सोशल मीडिया, अन्न-पाणी, डॉक्‍टर, युवक-युवती याप्रमाणे समित्या तयार करण्यात आल्या असून, त्यांच्यावर आपापली जबाबदारी सोपविली आहे. 
 
सोशल मीडियावर हाक 
या मोर्चात समाजातील सर्व घटकांना सहभागी करून घेण्यासाठी गावागावांत तयारी केली जात आहे. सोशल मीडियावर तर याच मोर्चाची चर्चा सुरू असून कुठल्याही परिस्थितीत मोर्चा यशस्वी करायचा, असा निर्धार करताना युवक, युवती पाहायला मिळत आहेत. फेसबुक, ट्विटरसह अन्य माध्यामांतून जय्यत तयारी केली जात आहे. त्यास मोठा प्रतिसाद मिळत आहे. 
 
महिला सरसावल्या 
तब्बल वर्षभरानंतर पुन्हा तोच जोश घेऊन रस्त्यावर उतरावेच लागेल, असे आवाहन समाजातील महिला बैठकांमधून करीत आहेत. कायम दुसऱ्यासाठी रस्त्यावर उतरताना कधीच मागेपुढे पाहिले नाही, मग आता आपल्यासाठी का शांत बसायचे, अशा पद्धतीने आवाहन केले जात आहे. त्यामुळे महिला मोठ्या संख्येनी सहभागी होतील, अशी आशा व्यक्‍त करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com