लष्कराच्या साथीने मराठवाडा करू हिरवा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

औरंगाबाद - दुष्काळाने नेहमी होरपळणारा मराठवाडा लष्कराच्या सहकार्याने हिरवाकंच करू, असा निर्धार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी (ता. चार) व्यक्त केला. अब्दीमंडीच्या माळावर इको टास्क फोर्स बटालियनच्या स्थापनेप्रसंगी ते बोलत होते. वनमहोत्सवाच्या चारच दिवसांत राज्यभरात सव्वादोन कोटी रोपे लावण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

औरंगाबाद - दुष्काळाने नेहमी होरपळणारा मराठवाडा लष्कराच्या सहकार्याने हिरवाकंच करू, असा निर्धार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी (ता. चार) व्यक्त केला. अब्दीमंडीच्या माळावर इको टास्क फोर्स बटालियनच्या स्थापनेप्रसंगी ते बोलत होते. वनमहोत्सवाच्या चारच दिवसांत राज्यभरात सव्वादोन कोटी रोपे लावण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

वनविभाग आणि संरक्षण मंत्रालय यांत झालेल्या सहकार्य करारानुसार, ‘इको टास्क फोर्स बटालियन’ स्थापन करण्यात आली. या करारानुसार मावसाळा ते रसूलपुरा रस्त्यावरील अब्दीमंडीच्या ६५ हेक्‍टर वनक्षेत्रात यावर्षी वृक्षारोपण करण्यात येत आहे. या वनसंगोपनाची जबाबदारी या बटालियनने घेतली असून, त्याचा शुभारंभ मंगळवारी एका विशेष कार्यक्रमात करण्यात आला. या कार्यक्रमाला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे, प्रशांत बंब, वनविभागाचे सचिव विकास खारगे, जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आर्दड, मुख्य वनसंरक्षक प्रकाश महाजन, अजित भोसले, उपवनसंरक्षक सतीश वडस्कर, लष्करातर्फे कर्नल वेंकटेश, कर्नल रामेश्वर शर्मा उपस्थित होते.

वनमंत्र्यांच्या हस्ते बटालियनच्या कोनशिलेचे अनावरण, वृक्षारोपण, वृक्षपूजन झाले. उपवनसंरक्षक श्री. वडस्कर यांनी कर्नल वेंकटेश यांच्याकडे ‘रोपवन दस्तऐवज’ हस्तांतरित केले. इको टास्क फोर्स बटालियनच्या ‘वानिकी क्षेत्रातील नवी पहाट’ या माहिती पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. सचिव विकास खारगे यांनी प्रास्ताविक केले. या वनीकरणासाठी बजेटमध्ये २८ कोटींची तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले. वनमंत्री म्हणाले, की ऑक्‍टोबर महिन्यात मराठवाडा मंत्रिमंडळ बैठकीत इको टास्क फोर्स बटालियन स्थापन करण्याबाबतचा विशेष निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर तत्कालीन केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर पुढील कार्यवाही करण्यात आली. राज्यातील पहिल्या इको टास्क फोर्स बटालियनची स्थापना औरंगाबादेत झाल्याची घोषणा त्यांनी केली. हरिभाऊ बागडे यांनी अध्ययक्षीय समारोप केला. सूत्रसंचालन सहायक वनसंरक्षक आशा भोंग यांनी केले. वनमंत्र्यांच्या हस्ते छावणी परिसरातही वृक्षारोपण करण्यात आले. राष्ट्रीय छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांनी ग्रीन आर्मीत सहभागी होऊन वृक्षलागवड व संवर्धन उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन या वेळी त्यांनी केले.

आणखी दोन कंपन्या येणार
सध्या ‘‘१३६, इंफन्ट्री बटालियन, इकोलॉजिकल महार’ रेजिमेंटची एक कंपनी या ठिकाणी नियुक्त करण्यात आली आहे. यात चार अधिकारी, पाच ज्युनिअर कमांडिंग ऑफिसर आणि १३९ जवान तैनात राहतील. अब्दीमंडीच्या ६५ हेक्‍टर क्षेत्रावरील सुमारे साडेतीन हजार रोपांची ते तीन वर्षे काळजी घेतील. इको बटालियनच्या कामासाठी खुलताबाद परिक्षेत्रातील १९५५ हेक्‍टरची निवड करण्यात आली असून, गरज पडल्यास आणखी दोन कंपनी बोलाविण्यात येतील, असे कर्नल वेंकटेश आणि वनसचिव विकास खारगे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

Web Title: aurangabad news marathwada environment