शहरात मॉन्सूनपूर्व पाऊस जोरदार बरसला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

औरंगाबाद - शहरात बुधवारी (ता. सात) मॉन्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली असून, तासभर झालेल्या पावसाने शहरातील रस्ते जलमय झाले, तर वातावरणात गारठा निर्माण झाला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने त्रस्त असलेल्या शहरवासीयांना दिलासा मिळाला. या पावसाची ३१ मिलिमीटर एवढी नोंद झाली आहे.

औरंगाबाद - शहरात बुधवारी (ता. सात) मॉन्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली असून, तासभर झालेल्या पावसाने शहरातील रस्ते जलमय झाले, तर वातावरणात गारठा निर्माण झाला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने त्रस्त असलेल्या शहरवासीयांना दिलासा मिळाला. या पावसाची ३१ मिलिमीटर एवढी नोंद झाली आहे.

मॉन्सून गेल्या काही दिवसांपासून केरळच्या पट्ट्यात अडकला असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. त्यामुळे शहरवासीय पावसाच्या प्रतीक्षेत असतानाच आज सुमारे तासभर पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यात दुपारी तीनच्या सुमारास पावसाला सुरवात झाली. पावसाने सुरवातीला  चांगलाच जोर धरला; मात्र त्यानंतर कांही काळ नुसतीच भुरभूर होती. यापूर्वी शनिवारी (ता. तीन), सोमवारी (ता. पाच) सुमारे ११.४ मि.मी. पाऊस पडला होता. बुधवारी (ता. सात) ३१ मिलिमीटर पाऊस शहरात पडल्याची नोंद एमजीएम वेधशाळेच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती खगोलशास्त्राचे अभ्यासक श्रीनिवास औंधकर यांनी दिली. मॉन्सून आलेला नसला तरी मृग नक्षत्राच्या सुरवातीला पावसाने दिलेली हजेरी शहराला सुखावणारी ठरली. मे महिन्याच्या उकाड्याला आता उतार पडला असून, तापमानाचा पाराही ३३ अंशांपर्यंत आला आहे. केरळात अडकून पडलेल्या मॉन्सूनने लक्षणीय प्रगती करीत उत्तर कर्नाटकपर्यंत मजल मारली आहे. महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर असलेल्या मॉन्सूनची एंट्री औरंगाबादेत आगामी ४८ तासांत होण्याची शक्‍यता असल्याचा अंदाज श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केले आहे.

आगामी आठवडा पावसाचा 
पुढील संपूर्ण आठवडा हा पावसाचा राहणार असल्याची शक्‍यता हवामान खात्याच्या वतीने वर्तविण्यात आली आहे. आगामी आठवडाभरात वातावरण ढगाळ राहणार असून, तापमानातही घट होण्याची शक्‍यता आहे. हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा शनिवारपर्यंत पडण्याची शक्‍यता आहे. रविवारी (ता. ११) पावसासह ढगाळ वातावरण राहणार असून, सोमवारी आणि मंगळवारी (ता. १३) मुसळधार पाऊस होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: aurangabad news marathwada monsoon