नामविस्तारदिनी लोटला  भीमसागर

नामविस्तारदिनी लोटला  भीमसागर

औरंगाबाद - आंबेडकरी अनुयायांच्या अस्मितेचा आणि जिव्हाळ्याचा विषय बनलेल्या नामांतर लढ्यानंतर विद्यापीठाच्या कमानीवर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिमाखात झळकल्याच्या घटनेचा २४ वा नामविस्तारदिन सोहळा रविवारी (ता. १४) उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त ‘भीमराया, घ्या तुम्ही या लेकरांची वंदना’ या भावनेतून विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराचे दर्शन घेण्यासाठी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी भीमसागर उसळला होता. 

जयभीमचा नारा देत भीमसैनिकांमध्ये उत्साह संचारला होता. कोरेगाव भीमा येथील घटनेच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असल्याने परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. नामविस्तारदिन वर्धापन सोहळ्यानिमित्त अभिवादन फेरी, वाहनफेरीने आंबेडकरी जनता सकाळपासूनच विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापाशी दर्शनासाठी गर्दी करीत होते. हळूहळू सायंकाळपर्यंत या गर्दीचे निळ्या सागरामध्ये रूपांतर झाले. कोरेगाव भीमा घटनेच्या पार्श्‍वभूमीवर कलापथकाद्वारे ‘कोरेगाव भीमाने दिलाय धडा, नव्या पेशवाईला मसनात गाडा’ या थीमवर पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भीमसैनिकांची मोठी गर्दी झाली होती. विविध पक्ष, संघटना; तसेच संस्थांतर्फे डॉ. आंबेडकर तसेच नामांतरात सर्वस्वाची आहुती देणाऱ्यांना आदरांजली वाहण्यात आली. सकाळपासून विविध संस्था, संघटनांतर्फे डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यासाठी रांगा लागल्या होत्या. अखिल भारतीय समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांना लष्करी थाटात मानवंदना दिली.

भीमशक्‍ती संघटनेच्या वतीने व अन्य संघटनांतर्फे बौद्ध उपासक, उपासिकांना भोजनदान करण्यात आले. भीमशक्‍तीतर्फे दहा क्विंटल खिचडी व अडीच क्विंटल बुंदीचे भोजनदान करण्यात आले होते. 

एक विचार, एक मंच या संकल्पनेमुळे परिसरात नेत्यांचे मोजकेच दोनच स्टेज लावण्यात आले होते. 

यंदा रस्त्याच्या कडेने बसणाऱ्या विक्रेत्यांना रस्त्याच्या खाली दूर स्टॉल लावण्यास सांगण्यात आल्याने विद्यापीठ गेटकडे जाणारे सर्व रस्ते पूर्णपणे मोकळे होते. यामुळे भीमसैनिकांनी रस्ते फुलून गेले होते. 

एक विचार, एक मंचच्या वतीने यंदा मदत केंद्र सुरू करण्यात आले होते. 

प्रत्येक वेळी भाऊ, दादांच्या शुभेच्छांच्या पोस्टर्सना एक विचार, एक मंचमुळे थारा नव्हता. यामुळे दरवर्षी पोस्टर्समध्ये झाकून जाणारे विद्यापीठ गेट या वेळी सुटसुटीत दिसत होते. प्रवेशद्वारावर आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली होती. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी १४ एप्रिलला राष्ट्रीय पातळीवर सार्वजनिक सुटी जाहीर करावी, यासाठी राबविण्यात येत असलेल्या स्वाक्षरी मोहिमेत अनेकजण स्वाक्षरी करून पाठिंबा दर्शवीत होते. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातर्फे घेण्यात आलेल्या रक्‍तदान शिबिरात ३५ बाटल्या रक्‍त संकलित झाले. 

भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दलाच्या वतीने औरंगपुरा येथील महात्मा जोतिराव फुले यांच्या पुतळ्यापासून निळे व पंचशील ध्वज हातात घेऊन अभिवादन फेरी काढण्यात आली होती.

सोहळ्यात विकली हजारो पुस्तके 
नामविस्तार सोहळ्यासाठी येणारा प्रत्येक आंबेडकरी अनुयायी प्रसाद रूपाने पुस्तकच घेऊन जात असतो. यामुळे रविवारी (ता. १४) नामविस्तार दिन सोहळ्यात एकाच दिवसात हजारो पुस्तकांची विक्री झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आत्मकथन, बुद्ध आणि त्यांचा धम्म, बहिष्कृत भारत या प्रबोधनात्मक पुस्तकांची मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन सोहळा एक असा सोहळा आहे जेथे पुस्तकांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. यामुळेच या भागात अन्य स्टॉलच्या तुलनेत पुस्तकांचेच स्टॉल मोठ्या प्रमाणात असतात. या परिसरात सुमारे ३०० पुस्तकांचे स्टॉल लागले असून हजारोंच्या संख्येने पुस्तकांची विक्री झाल्याचे ‘ज्ञानसागर पब्लिकेशन’चे सुधाकर देवकर यांनी सांगितले. प्रत्येक स्टॉलवर पुस्तके घेणाऱ्यांची गर्दी झाली होती. विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर नतमस्तक झाल्यानंतर आंबेडकरी जनतेची पावले वळत होती ती पुस्तकांच्या स्टॉलकडे. महात्मा जोतिराव फुले, माता रमाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सत्यशोधक विचारधारा या पुस्तकांना चांगली मागणी होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com