आता एकजूट कायम ठेवा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जानेवारी 2018

औरंगाबाद - कोरेगाव भीमाच्या घटनेनंतर औरंगाबादच्या तरुणांनी नेत्यांना एकत्र येण्यास भाग पाडले. समाज एक आहे हे यानिमित्ताने समोर आले. समाजाच्या अपेक्षाही पल्लवित झाल्या. आता ‘एक विचार, एक मंच’ हा राज्याचा विचार झाला पाहिजे आणि एकजूट कायम राहिली पाहिजे, असा सूर ‘एक विचार, एक मंच’च्या सभेतून उमटला. 

औरंगाबाद - कोरेगाव भीमाच्या घटनेनंतर औरंगाबादच्या तरुणांनी नेत्यांना एकत्र येण्यास भाग पाडले. समाज एक आहे हे यानिमित्ताने समोर आले. समाजाच्या अपेक्षाही पल्लवित झाल्या. आता ‘एक विचार, एक मंच’ हा राज्याचा विचार झाला पाहिजे आणि एकजूट कायम राहिली पाहिजे, असा सूर ‘एक विचार, एक मंच’च्या सभेतून उमटला. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त पहिल्यांदाच ‘एक विचार, एक मंच’ ही संकल्पना समोर आली. कोरेगाव भीमाच्या घटनेनंतर शहरातील तरुणाईने सूत्रे हातात घेतल्याने, नेत्यांना एका स्टेजवर येणे भाग पडले. या सभेसाठी आनंदराज आंबेडकर, भीमराव आंबेडकर, जोगेंद्र कवाडे, गंगाधर गाडे, मनोजभाई संसारे, नानासाहेब भालेराव, ॲड. विवेक चव्हाण, नानासाहेब इंदिसे यांची उपस्थिती होती. शहरातील एका मंचावर आलेल्या सर्वच नेत्यांना एकच हार घालून सर्वांचे स्वागत केले. मंचावरील नेत्यांनी हात उंचावून जनतेच्या अपेक्षांना प्रतिसाद दिला. भीमराव आंबेडकर म्हणाले की, आज परिस्थिती गंभीर आहे. ज्यांनी संपूर्ण आयुष्यभर बाबासाहेबांना विरोध केला, त्यांच्या जाण्यानंतर त्यांच्या विचाराला विरोध केला अशी मंडळी सत्तेत आहे. 

या मंडळींनी पहिल्यांदा आरक्षणावर घाला घालण्यास सुरवात केली. आता गांभीर्याने विचार करून एकजूट झाली पाहिजे. राजकीय चळवळीच्या कक्षा वाढविण्याची गरज असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.  नानासाहेब भालेराव यांनी आता संसदीय पद्धतीने नेता निवडून एकजुटीची ताकद कायम ठेवावी, अशी भावना व्यक्त केली. कोरेगाव भीमाला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे, अशी मागणीही त्यांनी केली. ॲड. विवेक चव्हाण म्हणाले, ‘‘कोरेगाव भीमा येथे जातीयवादी दगडफेक करीत होते, दलितांच्या गाड्या जाळत होते, तेव्हा पोलिस हातावर हात देऊन बघ्याची भूमिका घेत होते. घटनेनंतर दुसऱ्या दिवशी दलितांनी संताप व्यक्त केला.’’ मनोजभाई संसारे म्हणाले, ‘‘आंबेडकरी जनतेची अपेक्षा ही नेत्यांनी एकत्र यावे अशी आहे. नेत्यांनीही आता पायात भिंगरी असल्याप्रमाणे राज्यभर समाजात फिरून आम्ही तुमच्यासोबत असल्याचा विश्‍वास द्यावा. पोलिसांच्या राज्यभर झालेल्या कोम्बिंगच्या विरोधात मुंबईमध्ये रिडल्सच्या वेळी काढलेल्या मोर्चापेक्षाही मोठा मोर्चा काढावा.’’ आनंदराज आंबेडकर, गंगाधर गाडे, नानासाहेब इंदिसे यांनीही ऐक्‍य यापुढे टिकले पाहिजे, आंबेडकरी समूह एक झाला, आता नेत्यांना एक झाल्याशिवाय पर्याय नाही, म्हणूनच ऐक्‍य टिकण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. सिद्धार्थ मोकळे यांनी प्रास्ताविक, सूत्रसंचालन केले. 

ड्रोन कॅमेरे अन्‌ कुतूहल
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या सभेत ‘एक विचार, एक मंच’च्या कार्यकर्त्यांनी विचारमंचवर आपल्याकडे गोंधळ होणार नाही याची ग्वाही नागरिकांकडून घेतली. त्याला नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. खबरदारी म्हणून पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी स्वतः सभास्थळी भेट देऊन पाहणी केली. दोन ड्रोन कॅमेऱ्यांच्या मदतीने सभेवर पोलिसांनी नजर ठेवली होती. आकाशात फिरणाऱ्या ड्रोन कॅमेऱ्यांनी कुतूहल निर्माण केले होते. पोलिस आयुक्त यशस्वी यादव सभास्थळी आल्यानंतर त्यांचा संयोजकांतर्फे सत्कार करण्यात आला. मात्र, पोलिस आयुक्त येताच नागरिकांमधून कोम्बिंगचे गुन्हे मागे घ्या, अशी घोषणाबाजी सुरू झाली. पोलिस आयुक्त जाईपर्यंत नागरिकांमधून मागणी सुरूच होती. 

Web Title: aurangabad news marathwada namantar din dr babasaheb ambedkar marathwada unviersity