औरंगाबादमध्ये शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

आंदोलनाचा इशारा देणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या निवेदनानुसार पंचनामे करून मदत प्रस्तावीत करण्यात आल्याचे कळविले होते.
- प्रतापसिह कदम, विभागीय कृषी सहसंचालक औरंगाबाद.

औरंगाबाद - गुलाबी बोंड अळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हिवाळी अधिवेशनात सरकारने जाहीर केलेली मदत दोन महिन्यांनंरतही मिळाली नाही. यासाठी वारंवार निवेदने व आंदोलने करूनही उपयोग झाला नसल्याचा आरोप करत गंगापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी बुधवारी औरंगाबादच्या विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयासमोर अंगावर रॉकेल घेतले. आधीच तयारीत असलेल्या पोलिसांनी तत्परतेने हस्तक्षेप करत सर्व शेतकऱ्यांना लागलीच ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.

औरंगाबाद जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा आंदोलक शेतकरी संतोष पाटील जाधव (वजनापूरकर) यांच्या नेतृत्वात गंगापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी 7 फेब्रुवारीला विभागीय कृषी सहसंचालकांना आपल्या मागण्यांसदर्भात निवेदन सादर केले होते. राज्याच्या कृषिमंत्र्यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात बोंड अळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना बागायतीसाठी हेक्‍टरी 37 हजार 500, तर कोरडवाहूसाठी 30 हजार 800 रूपये तत्काळ मदत देण्याचे जाहीर केले होते. या घोषणेला दोन महिन्यांचा कालावधी लोटूनही घोषणेची अंमलबजावणी झाली नाही. घोषणेची तत्काळ अंमलबजावणी करून शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाईची मदत न दिल्यास आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला होता; मात्र या प्रकरणी काहीच हालचाल झाली नसल्याचा आरोप करत निवेदनकर्त्या शेतकऱ्यांनी आज थेट औरंगाबादच्या विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयासमोर रॉकेल अंगावर ओतून घेण्याचा प्रयत्न केला.

गारपिटीमुळे विदर्भातील उभे रब्बी पीक नष्ट झाले आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला वेळ नाही. विदर्भातील शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जायला वेळ नाही. या शेतकऱ्यांच्या तत्काळ मदतीसाठी प्रशासनाने कोणतेही पाऊल उचलले नाही. या धोरणामुळे राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याची वेळ आली आहे.
- डॉ. आशिष देशमुख, आमदार
Web Title: aurangabad news marathwada news farmer Self combustion