गारपीटग्रस्तांमध्ये 308 गावांची भर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

औरंगाबाद - मराठवाड्यात रविवारपासून (ता. 11) सुरू झालेल्या गारपिटीच्या सत्राचा फटका मंगळवारीही (ता. 13) बसला. मंगळवारी परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड आणि बीड या पाच जिल्ह्यांतील 308 गावांमध्ये या गारपिटीने जवळपास दहा हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे.

औरंगाबाद - मराठवाड्यात रविवारपासून (ता. 11) सुरू झालेल्या गारपिटीच्या सत्राचा फटका मंगळवारीही (ता. 13) बसला. मंगळवारी परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड आणि बीड या पाच जिल्ह्यांतील 308 गावांमध्ये या गारपिटीने जवळपास दहा हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे.

मराठवाड्यात रविवारपासून वादळ, गारपिटीसह अवकाळी पावसाचे थैमान सुरू आहे. आधी 46 हजार हेक्‍टरवर नुकसान केलेल्या या अवकाळी पावसाचा कहर कमी अधिक प्रमाणात सुरूच आहे. सोमवारीही काही भागांत अवकाळी पाऊस बरसला. मंगळवारी परभणी जिल्ह्यातील तीन तालुक्‍यांतील 85, हिंगोली जिल्ह्यातील दोन तालुक्‍यांतील 35, नांदेड जिल्ह्यातील सहा तालुक्‍यांतील 125, बीड जिल्ह्यातील एका तालुक्‍यातील 4, तर लातूर जिल्ह्यातील एका तालुक्‍यातील 59 गावांमध्ये अवकाळी पाउस व गारपिटीचा तडाखा बसला.

परभणी जिल्ह्यातील जिरायत, बागायत व फळपिकाचे नुकसान झाल्याची माहिती बुधवारी (ता. 14) सायंकाळपर्यंत विभागीय आयुक्‍तालयाकडे प्राप्त झाली नव्हती. परंतु हिंगोली जिल्ह्यातील 3127 हेक्‍टर, नांदेड जिल्ह्यातील 6771 हेक्‍टर, लातूर जिल्ह्यातील 502 हेक्‍टर, तर बीड जिल्ह्यातील 124.8 हेक्‍टर मिळून 10 हजार 524 हेक्‍टरवरील जिरायती, बागायती व फळपिकांना गारपिटीचा तडाखा बसला. यापैकी 7033 हेक्‍टवरील पिकांचे 33 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील 2535 हेक्‍टर, नांदेड जिल्ह्यातील 3872 हेक्‍टर, बीड जिल्ह्यातील 124.8 हेक्‍टर, तर लातूर जिल्ह्यातील 502 हेक्‍टरवरील पिकांचा समावेश आहे. परभणी जिल्ह्यात गारपीटीमुळे तीन व्यक्‍ती जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. नांदेड जिल्ह्यात 3 व लातूर जिल्ह्यातील 1 मिळून चार मोठे व एक लहान अशी 5 जनावरांचा या अवकाळी पावसात मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.

Web Title: aurangabad news marathwada news hailstorm loss rain