कंपन्यांनी कामगार भरती करताना स्थानिकांना प्राधान्य द्यावे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 मे 2017

व्यवस्थापनाने कामगार आणि पोलिस यांच्याशी मैत्रीचे संबंध असू द्यावे जेणेकरून कंपनीत कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही. पोलिस विभागाच्या नवीन अध्यादेशानुसार जर पोलिसांच्या पाल्याने त्या कंपनीतील भरती प्रक्रियेच्या पात्रतेच्या अटी जर तो पूर्ण करीत असेल तर त्या ठिकाणी पोलिसांच्या पाल्यांना संधी देण्यात यावी.

जायकवाडी : पैठण औद्योगिक वसाहतीमधील सर्व कंपन्यांनी कामगार भरती करताना स्थानिकांना प्राधान्य द्यावे. तसेच परराज्यांतील कामगार, दुसऱ्या जिल्ह्यांतील कामगार, तसेच सुरक्षा रक्षक भरती करताना त्यांची संपूर्ण चौकशी करूनच कामावर ठेवावे, असे प्रतिपादन पोलिस उपअधीक्षक स्वप्निल राठोड यांनी केले.

जायकवाडी (ता.पैठण) येथील पैठण औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्याच्या वतीने शनिवारी (ता.२७) दुपारी बाराला औद्योगिक वसाहतीमधील कंपनी व्यवस्थापकांची, कामगारांची सुरक्षा, समस्या व महिला कामगारांची ‘विशाखा’ समिती स्थापन्याबाबत पेप्सिको कंपनीच्या सभागृहामध्ये बैठक पार पडली. त्या वेळी ते बोलत होते.

श्री. राठोड म्हणाले, की व्यवस्थापनाने कामगार आणि पोलिस यांच्याशी मैत्रीचे संबंध असू द्यावे जेणेकरून कंपनीत कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही. पोलिस विभागाच्या नवीन अध्यादेशानुसार जर पोलिसांच्या पाल्याने त्या कंपनीतील भरती प्रक्रियेच्या पात्रतेच्या अटी जर तो पूर्ण करीत असेल तर त्या ठिकाणी पोलिसांच्या पाल्यांना संधी देण्यात यावी. 

सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर पायघन म्हणाले, की ज्या कंपनीत दहापेक्षा जास्त महिला  कामगार असतील त्या ठिकाणी महिला कामगारांसाठी ‘विशाखा’ समिती स्थापन करावी. ज्यामुळे महिला कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्‍न  उद्‌भवणार नाही. कंपनीत व्यवस्थापनाने एक महिला अधिकारी नेमावे त्यामुळे महिलांच्या समस्या सुटतील. 
कंपनी परिसरात पडलेले बोगदे व वॉल कम्पाउंड करून घ्यावे. याने भुरट्या चोऱ्या होणार नाही व कंपनीसह परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावीत.

या बैठकीला औद्योगिक वसाहतीतील एकूण छोट्या व मोठ्या ४० कंपनीच्या व्यवस्थापकांनी हजेरी लावली. ज्यामध्ये आर. एल. मुंगीकर, एम. बी. देशमुख, अशोक आठवले, ए. एन. गिरगे, संजय ठोसर, वीरेंद्र  गायकवाड, कलिम इनामदार या कंपन्याच्या व्यवस्थापकांसह गोपनीय शाखेचे पोलिस कर्मचारी सतीश राऊत, बीट जमादार सय्यद मुस्ताक, विजय पवार, रामेश्‍वर तळपे, जाकेर शेख, सूर्यकांत डहाळे, शरद पवार  यांची उपस्थिती होती.

Web Title: Aurangabad News Marathwada News Jayakwadi Sakal esakal