अनिष्ट रूढींचीही साफसफाई करा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

औरंगाबाद - जातिव्यवस्था, अंधश्रद्धा, स्वच्छता अभियान, सरकारची ध्येयधोरणे, सर्वसामान्यांची होणारी परवड यासह इतर विषयांवर कलावंतांनी प्रहसन सादर करून उपस्थितांना विचार करायला भाग पाडले. औचित्य होते ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सुरू असलेल्या केंद्रीय युवक महोत्सवात मंगळवारी (ता. ३१) रंगमंच तीनवर झालेल्या प्रहसन (स्कीट) स्पर्धेचे. यामध्ये कलावंतांनी विडंबनात्मक पद्धतीने सामाजिक प्रश्‍न मांडत सत्ताधाऱ्यांचे वाभाडे काढले. 

या रंगमंचावर विविध विषयांवर भाष्य करणारी १९ प्रहसने सादर झाली. औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयातील नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रा. डॉ. अनिलकुमार साळवे लिखित ‘द गेम्स ऑफ ब्लू व्हेल्स’मधून जातिव्यवस्थेवर मार्मिक भाष्य केले. देशात पूर्ववत चालत आलेल्या जातीय व्यवस्थेने अनेक पिढ्यांचे बळी घेतले आहेत. हा प्रकारही ‘ब्लू व्हेल्स गेम’च आहे, हे यातून सांगण्यात आले.  त्याला रसिकांनी भरभरून दाद दिली. अन्य एका संघाने ‘सैराट’ या सिनेमाच्या कथेचे विडंबन करून त्यातून स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगितले. गेवराई (जि. बीड) येथील आर. बी. अट्टल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणातील बाजारीकरण अधोरेखित केले. टेन्शन कसे असते, मनुष्य कसा त्याचा बाऊ करतो हे उत्कृष्टरीत्या ‘आजचा दिवस माझा उरलेल्या दिवसातील एक दिवस आहे’ यातून मांडले. ‘द गेम्स ऑफ ब्लू व्हेल्स’मध्ये अनिल राठोड यांची भूमिका सर्वांचे आकर्षण ठरली. यात शुभम गरुड, प्रकाश बांगर, परमेश्‍वर कोकाटे, अस्मिता भारती, जगदीश गोल्हार, सद्दाम शेख, रामेश्‍वर झिंजुडे, रवी बारवाल, मंगेश तुसे, सुजित देठे यांच्याही भूमिका भाव खावून गेल्या. धनंजय पवार, मिलिंद जोशी, डॉ. सफी नाईकवाडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या स्पर्धेसाठी विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. जयंत शेवतेकर, डॉ. राखी सलगर, प्रा. रामदास ठोके, प्रा. सुनील टाक, ओमकार घोडके, अमोल झेंडे, नितीन रसाळ, सचिन पंडित यांनी पुढाकार घेतला.

Web Title: aurangabad news marathwada university youth festival