विक्रेते, ‘एमआर’च्या चलाखीने खोट्या बिलांचे गौडबंगाल

medicine
medicine

औरंगाबाद - दलालवाडीतील औषधांच्या ठोक विक्रेत्याने वैद्यकीय प्रतिनिधींशी संगनमत करून शहरातील नामवंत डॉक्‍टर व मोठ्या रुग्णालयांच्या नावावर सवलतीत औषधे मागवली. त्याची खोटी बिले तयार करून विक्री केल्याप्रकरणी औषध प्रशासनाने आठ महिन्यांच्या तपासाअंती क्रांती चौक पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. १४) नऊ जणांवर गुन्हा नोंद केला. पुराव्यांसह सापडलेले राज्यातील हे पहिले रॅकेट समोर आल्याचे सहआयुक्त संजय काळे यांनी सांगितले.

औषध निरीक्षक माधव निमसे यांनी दिलेल्या तसेच ऑगस्ट २०१७ मध्ये मिळालेल्या माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासनाने २९ खोटी बिले ताब्यात घेतली होती. त्यानंतर या बिलांची तपासणी व फेरपडताळणी केली. त्यात दलालवाडीतील मनीष एजन्सीचे राजकुमार टिबेरवाला, कपिल टिबेरवाला, संदीप टिबेरवाला व डॉ. रेड्डीज्‌ कंपनीचे वैद्यकीय प्रतिनिधी (एमआर) श्रीकांत बेंडे, स्वप्नील धांडे, योगेश व्यवहारे, उल्हास मोकासे तसेच बायोकॉन कंपनीचे एम. आर. अब्दुल अजीम मोहम्मद अहमद या आठ जणांनी संगनमत करून शहरातील नामांकित डॉक्‍टर व रुग्णालयांच्या नावावर आठ लाख रुपयांची औषधी ठोक विक्रेत्यांपेक्षाही सवलतीच्या दरात औषध कंपनीकडून मिळवली. मात्र, ती ज्यांच्या नावावर मागविली त्यांना न देता किरकोळ विक्रेत्यांच्या व काही नामवंत डॉक्‍टरांच्या नावाचे खोटे सही-शिक्के बनवून, खोटी बिले बनवून गौडबंगाल केले. यातून वैद्यकीय प्रतिनिधींना असलेले टार्गेट फुगवले गेले तसेच टर्नओव्हरही फुगवण्यात आला. मात्र त्यातून करचुकवेगिरीचा प्रकार औषध प्रशासनाने समोर आणला. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात आठ जणांसह डॉ. रेड्डी कंपनीवरही गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई सहायक आयुक्त दस्तगीर शेख, औषध निरीक्षक राजगोपाल बजाज, माधव निमसे, प्रवीण हरक, मिलिंद कोळेश्‍वरकर, वर्षा महाजन यांनी आठ महिने तपास करून तडीस नेली. कर चुकवल्याप्रकरणी जीएसटी विभागालाही कळवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

औषध प्रशासनाची कारवाई 
फसवणूक करणाऱ्या  रॅकेटचा पर्दाफाश
५ प्रतिनिधी व ३ ठोक विक्रेत्यांसह कंपनीवर गुन्हा
टार्गेट व उलाढाल फुगवण्याचा प्रकार अंगलट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com