मिनी घाटी सुरू होणार ७ मार्चपूर्वी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

औरंगाबाद - दोन वर्षांपासून उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत असलेले चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय (मिनी घाटी) सात मार्चपर्यंत पूर्ण क्षमतेने सुरू करण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे सात मार्चपूर्वी कोणत्याही परिस्थितीत मिनी घाटी सुरू होईल, अशी माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी रविवारी (ता. २८) दिली.

औरंगाबाद - दोन वर्षांपासून उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत असलेले चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय (मिनी घाटी) सात मार्चपर्यंत पूर्ण क्षमतेने सुरू करण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे सात मार्चपूर्वी कोणत्याही परिस्थितीत मिनी घाटी सुरू होईल, अशी माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी रविवारी (ता. २८) दिली.

चिकलठाण्यात ३८ कोटी रुपये खर्च करून दोनशे खाटांच्या रुग्णालयाची इमारत मिनी घाटीसाठी उभारण्यात आली. गेल्या ऑक्‍टोबर महिन्यात रीतसर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हस्तांतरण करण्यात आले. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गोवर्धन गायकवाड यांनी बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्याचा प्रयत्न केला; मात्र आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी पूर्ण क्षमतेने रुग्णालय सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यामुळे खंडपीठाने दिलेल्या ३० नोव्हेंबरला अपुऱ्या यंत्रसामग्रीमुळे जिल्हा सामान्य रुग्णालय सुरू होऊ शकले नाही. दरम्यान, आरोग्यमंत्रीच आता जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्याने त्यांनी मिनी घाटीच्या लोकार्पणाच्या प्रश्‍नाकडे लक्ष दिले असून, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सात मार्चची डेडलाइन दिली आहे. त्यामुळे यंत्र व साधनसामग्रीच्या प्रक्रियेला वेग आला असल्याचे डॉ. कंदेवाड म्हणाले. 

सव्वातीन कोटी कधी मिळणार?
मिनी घाटीला पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी अजून ३ कोटी ३४ लाखांचा निधी लागणार आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून निधीसाठी अधिकारी प्रयत्नशील आहेत; मात्र निधी मंजुरी, खरेदी, इन्स्टॉलेशन यासाठी लालफीतशाहीतचा अडथळा दूर करणे अग्निदिव्य ठरणार आहे. त्यामुळे आता तरी सात मार्चची डेडलाइन हुलकावणी देणार नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पाण्याचा प्रश्‍न सुटेना 
तत्कालीन पालकमंत्री रामदास कदम यांनी ‘घाटी’ला आवश्‍यक सव्वाकोटींचा निधी व पाण्याची व्यवस्था करण्याचे फर्मान सोडले होते. दोन महिने उलटून या विषयात कोणतीही हालचाल झालेली नाही. त्यामुळे मिनी घाटीचा पाणीप्रश्‍न तसाच आहे. शिवाय नवीन जलवाहिनीसाठीचा ८७ लाखांचा निधी प्रलंबित आहे. त्यामुळे मिनी घाटीचा पाणीप्रश्‍न कर्करोग रुग्णालयासारखा प्रलंबित राहू नये, यासाठी दक्षता घ्यावी लागणार आहे. 

Web Title: aurangabad news mini ghati hosspital