क्रांती चौकातील मशिदीला दोन दिवसांचा अल्टिमेटम 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - क्रांती चौकातील रस्ता बाधित मशिदीवर हातोडा चालविण्यासाठी महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. या मशिदीवर कारवाई कशी काय करता? असा आक्षेप घेत गुरुवारी (ता. तीन) सर्वपक्षीय मुस्लिम नगरसेवकांनी आयुक्तांची भेट घेतली; मात्र त्यांच्या विरोधाला न जुमानता कारवाई तर होणारच अशी ठाम भूमिका घेतल्याने नगरसेवकांनी आयुक्तांच्या दालनातून काढता पाय घेतला. 

औरंगाबाद - क्रांती चौकातील रस्ता बाधित मशिदीवर हातोडा चालविण्यासाठी महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. या मशिदीवर कारवाई कशी काय करता? असा आक्षेप घेत गुरुवारी (ता. तीन) सर्वपक्षीय मुस्लिम नगरसेवकांनी आयुक्तांची भेट घेतली; मात्र त्यांच्या विरोधाला न जुमानता कारवाई तर होणारच अशी ठाम भूमिका घेतल्याने नगरसेवकांनी आयुक्तांच्या दालनातून काढता पाय घेतला. 

महापालिका प्रशासनाने अनधिकृत धार्मिक स्थळांच्या विरोधात गेल्या आठवड्यापासून मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत ३५ धार्मिक स्थळे पाडण्यात आली असून, अनेक ठिकाणी नागरिकांच्या वतीने या कारवाईला विरोध होत आहे; मात्र या विरोधाला न जुमानता पाडापाडी सुरूच आहे. दरम्यान, बुधवारी (ता. दोन) सायंकाळी उपायुक्त रवींद्र निकम यांचे पथक क्रांती चौकातील रस्ता बाधित मशिदीची पाहणी करण्यासाठी गेले होते. या वेळी मोठा जमाव जमला. एमआयएम, काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी या पथकाला घेराओ घालत तेथून जाण्यास भाग पाडले होते. या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी दुपारी सर्वपक्षीय मुस्लिम नगरसेवकांच्या पथकाने आयुक्तांची भेट घेतली. या शिष्टमंडळाने मशीद वक्‍फ बोर्डाच्या जागेवर असून, अद्याप भूसंपादन झालेले नाही. मशिदीवर कारवाई करू नये, असे न्यायालयाचे आदेश आहेत, असे असताना महापालिकेचे पथक तिथे गेलेच कसे? असा सवाल केला. शासन शिवसेना-भाजप युतीचे असल्यामुळे मशिदी पाडण्याबाबत तुमच्यावर दबाव आहे. या दबावाखालीच तुम्ही कारवाई करत आहात, असा आरोप करण्यात आला. 

सुरवातीला आयुक्तांनी नगरसेवकांची बाजू ऐकून घेतली. त्यानंतर मशीद अनधिकृत धार्मिक स्थळांच्या यादीत असून, कारवाई तर होणारच अशी भूमिका घेत तुम्ही महापालिकेच्या पथकाला कसे काय अडविले, असा प्रतिप्रश्‍न केला. न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई सुरू आहे, देशातील कायद्याचा मान राखलाच पाहिजे, असा टोलाही त्यांनी नगरसेवकांना लगावला. त्यानंतर नगरसेवकांनी नमते घेत ही कारवाई दोन आठवडे पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी केली. तसे करता येणार नाही, असे आयुक्तांनी उत्तर दिल्यानंतर किमान चार दिवसांचा तरी वेळ द्या, असा प्रस्ताव नगरसेवकांनी ठेवला. त्यालाही आयुक्तांनी नकार देत केवळ दोन दिवसांचा वेळ देण्यात येईल, असे स्पष्ट केले. आयुक्त आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे पाहून नगरसेवकांनी दालन सोडले. 

या वेळी नगरसेवक अफसर खान, अयुब जागीरदार, रेशमा कुरेशी, नासेर सिद्दिकी, फेरोज खान, अजीम खान, अब्दुल नाईकवाडी, अशफाक कुरेशी, एटीके शेख, सरवत बेगम, आरेफ हुसेनी यांच्यासह रफत यार खान, शेख अहमद यांच्यासह इतरांची उपस्थिती होती. 

कायदा-सुव्यवस्था आम्ही पाहू 
मशिदीवर कारवाई झाल्यास शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल, असा इशारा या वेळी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने दिला. त्यावर ते आम्ही पाहून घेऊ, असे उत्तर आयुक्तांनी दिले. 

जागा आहे संपादित 
कदीम मशिदीच्या या जागेचे अद्याप भूसंपादन झालेले नाही, हा मुद्दाही आयुक्तांनी खोडून काढला. त्यावेळी जागेसाठी नाममात्र एक रुपया, तर बांधकामापोटी ४९ हजार रुपये मोबदला जाहीर करण्यात आला होता. तो घेतला नसला तरी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होते, असे आयुक्तांचे म्हणणे होते. 

असा आहे वाद 
क्रांती चौक ते पैठणगेट हा रस्ता विकास आराखड्यात शंभर फूट रुंदीचा असून, त्यात मशीद बाधित आहे. मशिदीच्या ठिकाणी रस्ता सत्तर फुटाचाच आहे. तीस फूट जागा देण्यास विरोध झाला होता. पुढे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. पी. एस. पसरिचा यांची समिती नेमून शासनाने तोडगा काढला होता; मात्र कारवाई करू नये असे न्यायालयाचे आदेश नाहीत, असे आयुक्तांचे म्हणणे आहे.

Web Title: aurangabad news Mosque amc