सदोष मीटरने आणले महावितरणच्या नाकीनऊ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

औरंगाबाद - महावितरणमध्ये वीज गळतीबरोबरच सदोष आणि फेरफार केलेल्या वीज मीटरचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. औरंगाबाद परिमंडळात ४७ हजार विद्युत मीटर सदोष आणि फेरफार केलेले आहेत. यामुळे कोट्यवधी रुपयांचा फटका महावितरणला बसत आहे. 

औरंगाबाद - महावितरणमध्ये वीज गळतीबरोबरच सदोष आणि फेरफार केलेल्या वीज मीटरचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. औरंगाबाद परिमंडळात ४७ हजार विद्युत मीटर सदोष आणि फेरफार केलेले आहेत. यामुळे कोट्यवधी रुपयांचा फटका महावितरणला बसत आहे. 

वीज गळती, मोठ्या प्रमाणावर थकबाकी यामुळे महावितरणची यंत्रणा त्रस्त झाली आहे. औरंगाबाद व जालना जिल्ह्यात वीज गळतीचे प्रमाण ३० ते ४० टक्के आहे. वीज गळतीच्या बरोबरच वीज चोरीचे प्रमाणही अधिक आहे. वर्षभरात सहव्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया व मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी वीजगळती आणि वीज बिल वसुलीवर भर दिला, त्यामुळे काही प्रमाणात सुधारणा झाली. असे असले तरीही एकूणच यंत्रणेकडून होत असलेल्या दुर्लक्षितपणाने वीज चोरीचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. जिल्हा विद्युतीकरण समितीच्या बैठकीत या विषयावर प्रदीर्घ चर्चा करण्यात आली होती. शहरात फॉल्टी मीटर आणि फेरफार झालेले तब्बल ४७ हजार मीटर असल्याची महावितरणकडेच नोंद आहे. शहरात दहा वर्षांपूर्वी ड्रम प्रोजेक्‍ट राबविण्यात आला. यात शहरातील केबल अंडरग्राउंड करणे, ट्रान्स्फॉर्मरच्या क्षमता वाढवणे, नवीन सबस्टेशन उभारणे अशी काही कामे करण्यात आली होती; मात्र त्यावेळीच ४७ हजार मीटरमध्ये फेरफार असल्याचे आढळून आले होते. त्यावेळी त्यावर काहीही कारवाई झाली नाही. याकडे महावितरणने लक्ष देऊन दंडात्मक वसुली करण्याचे निर्देश खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिले आहेत. तरीही फॉल्टी मीटर बदण्याची गती वाढत नसल्याने महावितरणला कोट्यवधी रुपयांचा फटका बसत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: aurangabad news MSEB Faulty meter