महावितरणने तोडल्या दीड हजार जोडण्या 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

औरंगाबाद - महावितरणने थकबाकीसाठी बुधवारी (ता. 21) एका दिवसात तब्बल दीड कोटी रुपयांची वसुली केली असून, थकबाकी न भरणाऱ्या नवीन दीड हजार ग्राहकांचे वीज कनेक्‍शन तोडण्यात आले आहे. 

औरंगाबाद - महावितरणने थकबाकीसाठी बुधवारी (ता. 21) एका दिवसात तब्बल दीड कोटी रुपयांची वसुली केली असून, थकबाकी न भरणाऱ्या नवीन दीड हजार ग्राहकांचे वीज कनेक्‍शन तोडण्यात आले आहे. 

महावितरणची मोठ्या प्रमाणावर थकबाकी असल्याने शून्य मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी लाईनमन ते कार्यकारी अभियंत्यांपर्यंत वसुलीचे टार्गेट देण्यात आले आहे. मुख्य अभियंता सुरेश गणेशकर हे स्वत: या वसुली मोहिमेवर लक्ष ठेवून आहेत. शहराच्या अनेक भागात आणि मोठ्या थकबाकीदारांचा थेट संपर्क करून त्यांनी वसुलीसाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत. शहरात 60 हजार 498 ग्राहकांकडे 75 कोटी 30 लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये बुधवारी (ता. 21) एकाच दिवसात एक कोटी 49 लाख 69 हजार रुपयांची वसुली केल्याची माहिती महावितरणने दिली. शहर पॉवर हाऊस उपविभागात 226 ग्राहकांकडून दहा लाख 30 हजार रुपये वसूल करण्यात आले. तर 136 जणांचा वीजपुरवठा तोडण्यात आला. छावणी उपविभागात 352 ग्राहकांकडून 82 लाख 54 हजार रुपये वसूल करण्यात आले, तर 448 जणांचा वीजपुरवठा तोडण्यात आला. शहागंज उपविभागात 616 ग्राहकांकडून वीस लाख 92 हजार रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आली, तर 311 ग्राहकांची वीज तोडण्यात आली. चिकलठाणा उपविभागात 397 ग्राहकांकडून 23 लाख 93 हजार रुपये वसूल केले, तर थकबाकी न भरणाऱ्या 408 जणांचा वीजपुरवठा तोडण्यात आला. गारखेडा उपविभागात 334 ग्राहकांकडून दहा लाख चार हजार रुपयांची वसुली करून थकबाकी न भरणाऱ्या 55 ग्राहकांचा वीजपुरवठा तोडण्यात आला. त्याचप्रमाणे क्रांतीचौक उपविभागात तीस ग्राहकांकडून एक लाख साठ हजारांची वसुली करण्यात आली, तर 89 ग्राहकांचा वीजपुरवठा तोडण्यात आला. ही मोहीम दररोज सुरू असून, नागरिकांनी थकबाकी भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. 

Web Title: aurangabad news MSEB Recovery of one and a half crore in one day