महापालिकेची सायकल योजना ट्रॅकवर येईना!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - शहरातील प्रमुख चार रस्त्यांवर ‘सिटी ऑन सायकल’ योजना सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने तीन महिन्यांपूर्वी घेतला होता. मात्र, अद्याप ही योजना ट्रॅकवर आलेली नाही. हर्सूल, मिलिंद चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ गेट, जळगाव रोड आदी रस्त्यांची योजनेसाठी निवड करण्यात आली होती. 

औरंगाबाद - शहरातील प्रमुख चार रस्त्यांवर ‘सिटी ऑन सायकल’ योजना सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने तीन महिन्यांपूर्वी घेतला होता. मात्र, अद्याप ही योजना ट्रॅकवर आलेली नाही. हर्सूल, मिलिंद चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ गेट, जळगाव रोड आदी रस्त्यांची योजनेसाठी निवड करण्यात आली होती. 

शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत अनेक कामे करण्यात येणार असून, त्यात प्रमुख रस्त्यांवर सायकल ट्रॅक तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शहरातील वाहनांची वाढती संख्या व त्या प्रमाणात वाढणारे प्रदूषण यामुळे आगामी काळात सायकलचा वापर वाढवून प्रदूषण कमी करण्याचा हेतू यामागे होता. त्यानुसार महापालिकेने शहरात चार प्रमुख रस्त्यांवर सायकल चालविण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी ठिकठिकाणी थांबेही तयार करण्याचे जाहीर करण्यात आले. या थांब्यावरून नागरिक सायकल घेतील. ज्या भागात कामासाठी जायचे आहे, तिथे गेल्यानंतर जवळच्या थांब्यावर ही सायकल जमा करतील, परत येताना त्याच थांब्यावर सायकल घेतील, अशी ही योजना आहे. आयडियल सिटी केअर एंटरप्रायझेस मदतीने ‘सिटी ऑन सायकल’ हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. शहरात २५ ते ३० सायकल थांबे तयार करण्यात येणार आहेत. या सायकल थांब्यासाठी सहा बाय सहा चौरस फूट आकाराची जागा रेडिरेकनरनुसार भाडे आकारणी करून संबंधित एजन्सीला देण्यात येणार आहे. त्यानुसार स्थायी समितीने या प्रस्तावाला मंजुरीदेखील दिली; मात्र तीन महिने उलटले तरी महापालिकेची सायकल योजना रस्त्यावर आलेली नाही. 

असे  आहेत रस्ते व थांबे
पहिला मार्ग : हर्सूल, हडको टी पॉईंट, जिल्हाधिकारी कार्यालय, काळा दरवाजा, औरंगपुरा, क्रांती चौक, आनंद गाडे चौक, एमआयटी कॉलेज चौक.
दुसरा मार्ग : मिलिंद चौक, हॉटेल पंचवटी, क्रांती चौक, मोंढानाका पूल, सेव्हन हिल, सिडको बसस्थानक, धूत हॉस्पिटल.
तिसरा मार्ग : हडको टी पॉईंट, बीबी-का-मकबरा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट.
चौथा मार्ग : हर्सूल, रेणुकामाता मंदिर, आझाद चौक, बजरंग चौक, सिडको बसस्थानक.

Web Title: aurangabad news municipal corporation Cycle plan track