पतीच्या खुनासाठी ठेवले दरवाजे उघडे

पतीच्या खुनासाठी ठेवले दरवाजे उघडे

थंड डोक्‍याने रचला कट - दोन लाखाची सुपारी

औरंगाबाद - काही वर्षांपासून पती जितेंद्र होळकरकडून होत असलेल्या संशयावरून सतत त्रास, रोजची भांडणे आणइ कटकट संपवण्यासाठी तिने अत्यंत शांत राहून नियोजनबद्धपणे पतीलाच संपवण्याचा कट रचला. कार्यकर्त्याला सुपारी दिली. पाळत ठेवली. खुनाच्या दिवशी मारेकऱ्यांसाठी तिने चक्क मुख्य दरवाजा उघडा ठेवून थंड डोक्‍याने खून करवला.

सूत्रांनी सांगितले, की शासकीय सेवेत असलेली भाग्यश्री होळकर हिची किरण गणोरेसोबत आधीपासूनच चांगली ओळख होती. पती जितेंद्रकडून त्रास होत असल्याची बाब तिने त्याला सांगत कट रचला. पतीचा कायमचा काटा काढण्यासाठी तिने सुपारीची ऑफरही दिली. जिल्हा परिषदेपासून काही अंतरावर कारमध्ये किरण व भाग्यश्री भेटले. दोन लाख रुपयांत खुनाचा व्यवहार ठरला. यात दहा हजार रुपये किरणला तिने दिले. किरणने शेख बाबू व तौशिफ यांना कामाला लावले. खुनाच्या एक दिवस आधी अर्थात शुक्रवारी (ता. आठ) तौशिफने छत्रपतीनगर येथे जाऊन घराची रेकी केली. परिसर पाहणीही केली. त्यानंतर बाबू व तौशिफ यांनी त्याच रात्री खून करण्याचे ठरवले. 

दुसरीकडे घरात रात्री अकराच्या सुमारास भाग्यश्री व जितेंद्र यांचा नऊ वर्षीय मुलगा अभ्यास करीत होता. त्याला तिने झोपण्यास सांगितले. त्यानंतर जितेंद्र हेही वेगळ्या खोलीत जाऊन झोपले. याचवेळी नेहमी दार बंद केले जात असतानाही तिने कटाप्रमाणे दरवाजा उघडाच ठेवला. बाराचा ठोका झाल्यानंतर बाबू व तौशिफ घरात घुसले. त्यांनी भाग्यश्रीच्या खोलीला बाहेरुन कडी लावली. नंतर जितेंद्र यांच्या खोलीच्या दरवाजावर थाप मारली. पत्नी, मुलगा असेल म्हणून जितेंद्र यांनी दरवाजा उघडला आणि तिथेच त्यांचा शेवट झाला.

फास न बसल्याने चिरला गळा 
तौशिफ व बाबूने जितेंद्र यांना दोरीने बांधले. गळ्याभोवती फास दिला पण नायलॉन दोरीही दोघांच्या हातून सुटत होती. म्हणून चाकू काढून दोघांनी गळा चिरून जितेंद्र यांचा खून केला. मुख्य दरवाजातून ते बाहेर पडले व ‘काम फत्ते झाले’ असे किरणला फोनवरून सांगितले.

कोण आहेत संशयित...
संशयित किरण गणोरे याची आई व भाग्यश्री होळकर या एकाच कार्यालयात काम करीत होत्या. त्यामुळे किरणची व भाग्यश्रीची चांगलीच ओळख होती. त्याची आई दोन वर्षांपूर्वी निवृत्त झाली, दरम्यान किरण व तिचे दृढ संबंध झाले. तिची बहुतांश कामे किरण करीत होता. तर शेख तौशिफ याच्यावर मारहाणीचा यापूर्वी गुन्हा आहे. शेख हुसेन ऊर्फ शेख बाबू हा पडेल ती कामे करतो.

किरण गणोरेची शिवसेनेतून हकालपट्टी
जितेंद्र होळकर यांच्या खुनाच्या कटाशी संबंधित संशयित किरण गणोरे याची शिवसेनेतून रविवारी (ता.१०) हकालपट्टी करण्यात आली. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. 

नारळीबाग शाखेचे प्रमुख किरण गणोरे याचा हत्येशी संबंध असल्याचे पोलिस तपासात आढळल्याचे समजल्याने ही बाब पक्षप्रमुखांना कळविण्यात आली. यानंतर गणोरेला पक्षातून काढून टाकण्यात आले. अशा आरोपींना कोणत्याही प्रकारे ‘वाल्याचा वाल्मीकी’ करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न नसून, पक्षास अशा कृत्याची कोणतीही माहिती नसल्याचे प्रसिद्धिपत्रकात स्पष्ट करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com