स्मशानभूमी सापडल्या अतिक्रमणांच्या विळख्यात

राम काळगे 
बुधवार, 12 जुलै 2017

निलंगा - तालुक्‍यातील बहुतांश गावांतील स्मशानभूमीचा प्रश्‍न ‘आ’वासून उभा असून, याबाबत गावातील पुढाऱ्यांबरोबरच प्रशासनही उदासीन आहे. प्रत्येक गावातील पारंपरिक स्मशानभूमीच्या जागा अतिक्रमणांच्या विळख्यात सापडल्या आहेत.

निलंगा - तालुक्‍यातील बहुतांश गावांतील स्मशानभूमीचा प्रश्‍न ‘आ’वासून उभा असून, याबाबत गावातील पुढाऱ्यांबरोबरच प्रशासनही उदासीन आहे. प्रत्येक गावातील पारंपरिक स्मशानभूमीच्या जागा अतिक्रमणांच्या विळख्यात सापडल्या आहेत.

तालुक्‍यात ११६ ग्रामपंचायती असून १६२ गावे आहेत. गावातील स्मशानभूमीवर झालेले अतिक्रमण काढणे व सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतीची आहे; मात्र अनेक गावांतील लोकांनीच सार्वजनिक स्मशानभूमीवर अतिक्रमणे केली असून, ती काढण्यासाठी बहुतांश ग्रामपंचायती धजत नाहीत. त्यामुळे मृत व्यक्तीचे दहन अथवा दफन करण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. तालुक्‍यातील अनेक गावांत स्मशानभूमीसाठी जागा नसल्याची बाब पंचायत समितीकडून संकलित केलेल्या अहवालानुसार स्पष्ट होते. गावामध्ये हिंदू, लिंगायत व मुस्लिम अशा स्मशानभूमीच्या नोंदी असल्या तरी अनेक गावांत या समाजांच्या स्मशानभूमीसाठी जागा नाही. असलेल्या जागेवर अतिक्रमण केलेले असून काही ठिकाणी स्मशानभूमीच्या जागेचा सातबारा व ‘आठ-अ’ला नावनोंदणीसाठी नागरिकांना झगडावे लागत आहे. मुस्लिम समाजातील स्मशानभूमीच्या नोंदी वाजीब-उल-हक्क रजिस्टरला नसल्यामुळे या रजिस्टरला नोंदणी करण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. 

तालुक्‍यातील जाजणूर, ढोबळेवाडी, भूतमुगळी, आंबुलगा-मेन, शेंद, हंगरगा-सिरशी, धानोरा, टाकळी, केदारपूर, बोटकुळ, वांजरवाडा, कलांडी, मचरटवाडी, वळसांगवी, हाणमंतवाडी, निटूर, राठोडा, शिरोळ, शिऊर, गिरकचाळ, हालसी-तुगाव, बडूर, चिचोंडी आदी गावांत काही समाजांसाठी स्मशानभूमीत शेड आहेत. काही कोणत्याही समाजासाठी स्मशानभूमी शेड नाही. कलमुगळी, ताडमुगळी, शिराढोण, नेलवाड, मिरगनहळ्ळी, चिचोंडी यासह अन्य गावांतील स्मशानभूमीला शेड नाही. शिवाय अंत्यविधीसाठी स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ते नाही, संरक्षण भिंत नाही. काही गावांतील स्मशानभूमीची नोंद सातबारा अथवा ग्रामपंचायत ‘आठ-अ’ रजिस्टरला नाही. त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असून अंत्यविधीसाठी येणाऱ्या पाहुण्यांनाही मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. गावागावांमध्ये विविध समाजांचे लोक राहत असले तरी त्या-त्या समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमी नाही. त्यामुळे सर्वच समाजांचे अंत्यविधी एकाच ठिकाणी केले जाते. यापूर्वी काही गावांत स्मशानभूमी नसल्याने काहींनी चक्क मृतदेह तहसील कार्यालयात आणले होते. तर हाडोळी येथील एका व्यक्तीने स्मशानभूमीसाठी जागा मिळावी म्हणून तहसील कार्यालयातील झाडावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. 

ज्या गावात स्मशानभूमी नाही अशा गावांमध्ये मृत झालेल्या व्यक्तीच्या दु:खापेक्षा अंत्यविधी कोठे करावा, याची चिंता अधिक असते. मुस्लिम समाजासाठी दफनभूमीच्या नोंदी शासनदरबारी नसल्या तरी तेथे मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. सार्वजनिक स्मशानभूमीत पिण्याच्या पाण्याची समस्याही आहे. गावागावांमध्ये अतिक्रमणांच्या विळख्यात सापडलेल्या स्मशानभूमी अतिक्रमणमुक्त करण्याची गरज आहे. गेल्या अनेक वर्षांपासून काही गावांत असलेली स्मशानभूमीची समस्या कायमची मिटविण्याची गरज असून केवळ कागदोपत्रीचा खेळ प्रशासनाकडून केला जात आहे. अतिक्रमण झालेल्या स्मशानभूमी मोकळ्या करण्यासाठी आता गटविकास अधिकारी व तहसीलदारांकडून व्यापक मोहीम राबविण्याची गरज आहे.

तालुक्‍यातील ज्या गावामध्ये स्मशानभूमी नाहीत अशा गावांतून ग्रामपंचायतीने प्रस्ताव सादर करणे गरजेचे आहे. त्यानंतरच पुढील कार्यवाही केली जाते. ज्या गावात सरकारी जागा उपलब्ध आहे त्याबाबत नोंदणी करण्याचे आदेश ग्रामपंचायतीला देण्यात येतील तर सरकारी जागा उपलब्ध नसल्यास भूसंपादनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येईल.
- शिवाजी कदम,  नायब तहसीलदार, महसूल

ज्या गावात सार्वजनिक स्मशानभूमीवर अतिक्रमण करण्यात आले आहे, तेथे अतिक्रमण काढण्याबाबतचे सर्व अधिकार ग्रामपंचायतीला आहेत. जेथे स्मशानभूमी शेड नाही अशा ठिकाणचे प्रस्ताव ग्रामपंचायतीने वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविणे गरजेचे आहे. शिवाय स्मशानभूमीला जागा उपलब्ध करून देणे अथवा संपादित करण्याचे अधिकार महसूल विभागाला आहेत.
- राजकुमार मुक्कावार,  गटविकास अधिकारी

निलंग्यातील स्मशानभूमी सुशोभीत 
निलंगा तालुक्‍यातील विविध गावांत श्रमदानाची चळवळ मोठ्या प्रमाणात सुरू झाली असून नागरिक स्वयंस्फूर्तीने यात सहभाग घेत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी हलगरा येथे स्वतः श्रमदान केले. त्याचाच एक भाग म्हणून येथील सार्वजनिक स्मशानभूमीत निलंगा शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने दररोज श्रमदान करून या स्मशानभूमीतील रस्ते, नाले तयार करून तेथे वृक्षारोपण करण्यात आले. ही स्मशानभूमी सुशोभीत करण्यात आली. त्यामुळे आता ग्रामीण भागातही श्रमदान चळवळीतून स्मशानभूमीचा विकास साधावा लागणार आहे.

Web Title: aurangabad news nilanga news encroachment graveyard