आरटीईअंतर्गत मोफत प्रवेश नाकारणाऱ्या शाळेला नोटीस 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

औरंगाबाद - मोफत शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेश देणे बंधनकारक असताना विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणाऱ्या शहरातील अग्रसेन विद्यामंदिर या शाळेला जिल्हा परिषदेने नोटीस बजावली आहे. ज्या शाळा प्रवेश देणार नाहीत त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल, असा इशारा शिक्षणाधिकारी एस. पी. जयस्वाल यांनी दिला आहे. 

औरंगाबाद - मोफत शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेश देणे बंधनकारक असताना विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणाऱ्या शहरातील अग्रसेन विद्यामंदिर या शाळेला जिल्हा परिषदेने नोटीस बजावली आहे. ज्या शाळा प्रवेश देणार नाहीत त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल, असा इशारा शिक्षणाधिकारी एस. पी. जयस्वाल यांनी दिला आहे. 

शिक्षण कायद्याअंतर्गत आर्थिक मागास असलेल्या विद्यार्थ्यांना कुठल्याही माध्यमाच्या शाळांनी मोफत प्रवेश देणे आवश्‍यक आहे. गेल्या आठवड्यात यासाठी ड्रॉ काढण्यात आला आरटीई ऍक्‍टनुसार 2018-19 साठी मुलांना उच्चभ्रू शाळेमध्ये प्रवेश मिळू लागला. परंतु शहरातील काही शाळा प्रवेश घेण्यासाठी गेलेल्या पालकांना परत पाठवीत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. काही पालकांनी शिक्षणाधिकारी एस. पी. जयस्वाल यांची भेट घेऊन तक्रारी केल्या. 

पैठण रोडवरील अग्रसेन शाळेने जिल्हा परिषदेने पाठविलेल्या 52 विद्यार्थ्यांच्या यादीपैकी केवळ 17 जणांनाच प्रवेश दिला; तसेच काही जवळच्यांना प्रवेश दिल्याची तक्रार करण्यात आली. शिक्षणाधिकाऱ्यांनी या तक्रारींची दखल घेत अग्रसेन शाळेला नोटीस बजावली असून, ज्या शाळा प्रवेश देणार नाहीत त्यांनाही नोटिसा देऊन कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. 

शाळा अचानक बंद, पालकांची धावाधाव 
गेल्या वर्षीच्या शाळांच्या याद्यानुसार प्रवेश क्षमतेत जिल्हा परिषदेने मोफत प्रवेशाचे नियोजन केलेले आहे. त्यानुसार पालकांनी ऑनलाइन अर्ज भरले; परंतु काही शाळा अचानक बंद झाल्याचा अनुभव पालकांना प्रवेश घ्यायला गेल्यानंतर येऊ लागला आहे.

आज यासंदर्भात पालकांनी 
शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार केली. विशेष म्हणजे या शाळांची नावे याद्यांमध्ये असल्यामुळे पालकांनी या शाळांसाठी अर्ज भरलेले आहेत. आता या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या विद्यार्थ्यांचे काय करायचे? याबाबत शासनाकडे मार्गदर्शन मागविण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी जयस्वाल यांनी सांगितले. 

Web Title: aurangabad news Notice to the school refusing to grant free admission under RTE