ऑनलाईन भरतीतही लुबाडले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - घाटी रुग्णालयाच्या बोगस भरती प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर, घाटी प्रशासनाकडे पुन्हा दोन नवीन तक्रारी प्राप्त झाल्या. याप्रकरणी राजेंद्र पोहाल याला मंगळवारी (ता. २४) अटक झाल्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश झाला, असा समज फोल ठरला; मात्र आता हे प्रकरण एवढ्यावरच न थांबता यातील व्याप्ती वाढू लागली आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक कार्यालयामार्फत झालेल्या ऑनलाईन भरती प्रक्रियेच्या नावाखाली फुलंब्री तालुक्‍यातील दोघांना लाखोंचा गंडा घातल्याची माहिती समोर आल्याने घाटी प्रशासन हादरले आहे.

एका सत्ताधारी बड्या राजकीय पुढाऱ्याच्या जवळच्या व्यक्तीने नातेवाइकाला नोकरी लावण्यासाठी घाटी रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याला १४ लाख रुपये दिले; तर आणखी एकाने नऊ लाख रुपये दिल्याचे सूत्रांनी सांगितले. दुसऱ्या कर्मचाऱ्याला शहरातील क्रांतीनगर, गांधीनगर व नांदेड येथील पंधरा ते वीस जणांकडून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घातला असल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोहाल याला अटक झाल्यानंतर आणखी दोघांची नावे समोर येत असल्याने या प्रकरणाची व्याप्ती प्रचंड मोठी असल्याचे समोर येत आहे. अद्याप यातील नव्या म्होरक्‍यांच्या तक्रारी पोलिसांपर्यंत आल्या नाहीत. असे असले तरीही पैसे घेऊन गायब असलेले दोघेजण अद्याप फरारच आहेत. चौकशी सुरू झाल्याने पैसे हडप करणाऱ्यांनी महिनाभरात सर्व पैसे परत देण्याचे अश्‍वासन दिल्याने फसवणूक झालेले गप्प आहेत, अशी चर्चा सध्या सुरू आहे. 

ते कर्मचारी मेपासून कामावर गैरहजर 
नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपये लुबाडले; मात्र पैसे देऊन काम तर झालेच नाही; पण हेच लोक आता भरती रद्द झाल्याचे सांगून वेळ मारून नेत आहेत. फसवणूक झाल्याने पैसे परत घेण्यासाठी उमेदवारांचा तगादा सुरू झाल्याने हे पैसे हडप करणारे कर्मचारी अनेक दिवसांपासून गायब आहेत, ते ड्युटीवरही नाहीत. विशेष म्हणजे ज्यांनी मध्यस्थांची भूमिका निभावली तेही अडचणीत सापडले आहेत.  

मागच्या चेहऱ्याची खमंग चर्चा 
फसवणूक करणारे हे चतुर्थश्रेणी कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांनी हे कोणाच्या भरवशावर केले याची खमंग चर्चा घाटीत दिवसभर सुरू होती. त्यांनी हुबेहूब नियुक्तिपत्र तयार कसे केले? सारखेच फॉन्ट, शिक्का आणि तत्कालीन अधिष्ठाता, वैद्यकीय संचालकांच्या सह्यांची काही पत्रे दिली गेली आहेत. त्यामुळे यामध्ये ‘बड्या हस्ती’ असण्याचीही शक्‍यता निर्माण झाली आहे. अद्याप पोलिसांत तक्रार दाखल नसल्याने खुलासा होऊ शकला नाही; मात्र पैसे वेळेवर परत मिळाले नाही तर हे लोकही लवकरच पोलिसांपर्यंत जाणार हे निश्‍चित!

Web Title: aurangabad news Online Recruitment issue