मराठवाड्यात पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 मे 2017

कर्जबाजारीपणाला कंटाळलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जिवन संपविण्याचे प्रकार दिवसे- दिवस वाढत जात आहेत. त्यात शुक्रवारी (ता.26) शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा कहरच झाला. जिल्हयातील पाथरी, पूर्णा व परभणी या तीन तालुक्यातील पाच शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळले

पाथरी / पूर्णा / परभणी : कर्जबाजारीपणाला कंटाळलेल्या जिल्ह्यातील पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या खळबळ जनक घटना घडल्या. यात पाथरीतील तीन व पूर्णेतील एका शेतकऱ्याने शुक्रवारी (ता.26) तर झाडगाव (ता.परभणी) येथील एका शेतकऱ्याने शनिवारी (ता.27) भर दिवसा विषारी औषध पिऊन आत्महत्या केली.

दोन दिवसात जिल्ह्यात पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे.

कर्जबाजारीपणाला कंटाळलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जिवन संपविण्याचे प्रकार दिवसे- दिवस वाढत जात आहेत. त्यात शुक्रवारी (ता.26) शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा कहरच झाला. जिल्हयातील पाथरी, पूर्णा व परभणी या तीन तालुक्यातील पाच शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळले.

देगाव (ता.पूर्णा) येथील वैजनाथ बाबूराव वळसे (वय 38) शेतकऱ्याने लिंबाच्या झाडाला गळफास घेउन आत्महत्त्या केली.सदरील घटना शनीवारी (ता.27) सकाळी उघडकीस आली. वैजनाथ वळसे यांनी त्यांच्या शेता शेजारील शिंदे यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेउन आत्महत्या केली. एकत्र कुटुंब असल्याने भारतीय स्टेट बॅंकेचे दोन लक्ष रुपयांचे कर्ज त्यांच्या वडिलाच्या नावावर आहे. सततच्या नापिकीमुळे व निसर्गाच्या अवकृपेमुळे ते सतत तणावात वावरत होते. त्यातच भावाला किडनीचा आजार झाल्याने खर्चही वाढला. आई -वडील व दुसरे दोन भाऊ असे हे कुटुंब जमीन जेम तेम सहा एकर आहे. वैजनाथला आठ वर्षाचा एक मुलगा आहे.

पाथरी तालुक्यातील लोणी बु. येथील शेतकरी मारुती निवृत्ती रासवे (वय 52) या शेतकऱ्याने शुक्रवारी (ता.26) रात्री साडेआठच्या सुमारास त्यांच्या घराच्या छतावर बसून विषारी औषध प्राशन केले. त्यांच्या पत्नी जेवणाचे ताट घेऊन छतावर गेल्या असता त्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांना परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा शनिवारी (ता.27) सकाळी मृत्यु झाला. त्यांना दोन मुले असून एक अपंग आहे. तर एकाचे लग्न झाले आहे.बॅंक ऑफ महाराष्ट्रचे 60 हजार, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे 20 हजार रुपयांचे कर्ज होते. या कर्जाला कंटाळून या शेतकऱ्याने आत्महत्या केली.

दुसरी घटना तालुक्यातील पाथरगव्हाण बु. येथे घडली. येथील कडीला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या शेतकऱ्याच्या कुटूंबात साडेचार एकर शेती तर हैदराबाद स्टेट बॅंकेचे एक लाख 60 हजार रुपये तर जिल्हा बॅंकेचे 60 हजार रुपये असे दोन लाख दोन हजार रुपयांचे कर्ज होते. नापिकी आणि कर्जाला कंटाळून या शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. तर तिसरी घटना तालुक्यातील सिमुरगव्हाण येथे घडली.

कैलास बालासाहेब उगले (वय 27) या अविवाहित तरूणाने ता.26 मे रोजी सकाळी साडेदहा वाजता स्वताच्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. उपचारा दरम्यान त्यांचा मानवत येथे मृत्यु झाला.

झाडगाव (ता.परभणी) येथील तरुण शेतकरी गोपाळ रामराव ढगे (वय 27) या तरुण अल्पभूधारक शेतकऱ्यानेही शनिवारी (ता.27) दुपारच्या सुमारास स्वत:च्या शेतात विषारी औषध पिल्याचे कुटुंबियांच्या लक्षात आल्याने त्याला तातडीने येथील खासगी रुग्णालयात आणण्यात आले. परंतू, प्रकृती अधिकच खालावल्याने लगेचच जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. उपचारा दरम्यानच त्याचा मृत्यू झाला. त्याला केवळ अडीच एकर जमीन असून विविध बंकांचे दोन लाख रुपयांचे कर्ज त्याच्यावर होते. या कर्जाच्या परतफेडीच्या चिंतेने त्याने जीवनयात्रा संपवली. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे.

Web Title: Aurangabad News Parbhani news Marathwada news farmers suicide