पेट्रोल @ ८०.०८ रुपये!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जानेवारी 2018

औरंगाबाद - पेट्रोलचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. मंगळवारी (ता. १६) तर औरंगाबादकरांनी ८०.०३ रुपये प्रतिलिटर किंमत मोजत आपल्या वाहनांमध्ये इंधन भरले. 

औरंगाबाद - पेट्रोलचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. मंगळवारी (ता. १६) तर औरंगाबादकरांनी ८०.०३ रुपये प्रतिलिटर किंमत मोजत आपल्या वाहनांमध्ये इंधन भरले. 

सुमारे दोन महिन्यांपूर्वी पेट्रोलचे भाव ८० रुपये प्रतिलिटर झाल्याने नागरिकांनी ओरड केली होती. जनतेचा असंतोष लक्षात घेत राज्य आणि केंद्र सरकारने प्रत्येकी दोन रुपयांची कर कपात करीत हे भाव लिटरमागे ७६ रुपयांपर्यंत खाली आणले होते. हा दिलासा मात्र फार काळासाठी टिकला नाही आणि अवघ्या दोन महिन्यांत सरकारने पेट्रोलची किंमत ८० रुपयांपर्यंत नेली. रुपयांऐवजी पैशांमध्ये दिवसागणिक होणाऱ्या वाढीने आता औरंगाबादेत पेट्रोल ८० रुपये ०८ पैशांनी खरेदी करावी लागत आहे. औरंगाबादकरांनी पेट्रोलसाठी १४ सप्टेंबर २०१३ रोजी ८३.८६ रुपयांची सर्वोच्च किंमत मोजली होती. आता किमतीची पाऊले त्याच दिशेने जात असून,  भाववाढ होत राहिली तर पेट्रोलचे दर ही सर्वोच्च किंमतही पार करण्याची चिन्हे आहेत. जगणे महाग करणारी डिझेलची दरवाढही मोठ्या प्रमाणावर झाली आहे. ३१ ऑगस्ट २०१४ रोजी औरंगाबादकरांनी ६८.६९ रुपये प्रतिलिटर किंमत मोजली होती. मंगळवारी डिझेलचा दर लिटरमागे ६६.८४ एवढा राहिला. दरम्यान, देशभरात विकले जाणारे पेट्रोल हे १० टक्के इथेनॉलमिश्रित असून, त्यातही मोठा फायदा सरकारी तिजोरीला होतो. 

पंपांवर वाद वाढले
दिवसागणिक होणारी वाढ आणि वाहनांत त्यामुळे कमी पडणारे इंधन पंपांवरील वाद वाढविणारे ठरत आहेत. लोक किमतींकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे वाहनात कमी आलेले इंधनही त्यांना दिसत नाही. नियमित अंतरापेक्षा वाहन कमी चालले की वाहनचालक येऊन पंपांवरील कर्मचाऱ्यांशी वाद घलतात. त्यांना दररोज होणारी वाढ समजावून सांगताना कर्मचारी बेजार होत असल्याचे पेट्रोलपंप वितरक संघटनेचे सचिव अकिल अब्बास यांनी सांगितले. 

 पेट्रोल वाढ @ २.४८, तर डिझेल ४.७३ 
१ डिसेंबर २०१७ रोजी शहरातील पेट्रोलचे दर ७७.५५ रुपये एवढे होते. तर १६ जानेवारीला औरंगाबादेत हा आकडा ८०.०३ रुपयांपर्यंत गेला. डिझेलच्या बाबतीतच दरवाढ अधिक वेगवान राहिली. १ डिसेंबरला ६२.११ रुपये प्रतिलिटर भाव असलेल्या डिझेलचा दर १६ जानेवारीला ६६.८४ रुपयांपर्यंत गेला. ४६ दिवसांत पेट्रोलची २.४८ रुपये, तर डिझेलची ४.७३ रुपयांनी वाढ झाली आहे.

Web Title: aurangabad news petrol price