पोलिस आयुक्तालयात तक्रार अर्ज पाण्यात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

औरंगाबाद  - धो धो बरसणाऱ्या पावसाने दीड तास जोर धरला खरा; पण याचा फटका पोलिस आयुक्तालयातील आवक-जावक शाखेला बसला. अलंकार सभागृहासमोर सुरू केलेल्या या सभागृहात पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे विविध रकान्यांत ठेवलेले अर्ज, कागदपत्रे भिजली व अन्य कागदपत्रांचे नुकसान झाले.

औरंगाबाद  - धो धो बरसणाऱ्या पावसाने दीड तास जोर धरला खरा; पण याचा फटका पोलिस आयुक्तालयातील आवक-जावक शाखेला बसला. अलंकार सभागृहासमोर सुरू केलेल्या या सभागृहात पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे विविध रकान्यांत ठेवलेले अर्ज, कागदपत्रे भिजली व अन्य कागदपत्रांचे नुकसान झाले.

पोलिस आयुक्तालयाच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. पाडापाडीमुळे विविध शाखांसह आवक-जावक शाखाही नियोजित जागेतून हलविण्यात आली. आवक-जावक शाखेला अलंकार सभागृहासमोर कंपार्टमेंट करून कामकाजासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. बुधवारी (ता. १४) दुपारी अडीचनंतर दमदार पावसाला सुरवात झाली. आयुक्तालयातील दर्शनी भागात पावसाचे पाणी साचले. त्यानंतर पावसाने आणखी जोर धरला. त्यामुळे अलंकार सभागृहाच्या समोर ‘ॲडजस्ट’ केलेल्या आवक-जावक कार्यालयातील फायबर-काचेच्या कंपार्टमेंटमध्ये पाणी शिरले. त्यात महत्त्वाची कागदपत्रे व तक्रार, विनंत्या अर्ज भिजले. मोठ्या प्रमाणात पाणी अचानक आल्याने उपस्थित कर्मचारी गांगरून गेले. त्यांची धांदल उडाली. त्यांनी कसाबसा कागदपत्रांचा व तक्रारअर्ज गोळा करून कोरड्या जागी हलवले. एवढ्या वेळात आवक-जावक शाखेत पाणीच पाणी झाले. पाऊस कमी झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी कागदपत्रांची व कार्यालयाची सारवासारव केली.

कागदपत्रे धोक्‍यात...
आयुक्तालयात तक्रार देण्याऐवजी आधी ठाणे, सहायक आयुक्त व नंतर आयुक्तांकडे यावे असे अलिखित निकष नव्याने लावले आहेत. थेट तक्रार हातोहात घेतली जात नसल्याने परिणामी आवक-जावक शाखेत तक्रारी देण्याकडे नागरिकांचा कल वाढला. पण पावसाने या तक्रारदारांच्या न्याय मिळण्याच्या आशेवर पाणी फेरले गेले.     

कार्यालय हलविण्याची गरज
आयुक्तालयाच्या नव्या इमारतीचे काम पूर्ण होण्यास मोठा अवधी आहे. दुसऱ्या-तिसऱ्या पावसानेच आवक-जावक शाखेत गळती सुरू झाली. महत्त्वाची कागदपत्रे पाण्यात भिजू नयेत, तसेच कर्मचाऱ्यांची निदान बसण्यासाठीची सोय व्हावी यासाठी तरी आता आवक-जावक शाखा सुरक्षित ठिकाणी हलविण्याची गरज निर्माण झाली आहे.

Web Title: aurangabad news Police Commissionerate