शहराच्या प्रदूषणाने गाठली धोकादायक पातळी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - शहराच्या प्रदूषणाने धोकादायक पातळी गाठली असून, हवेतील धूलिकण, कार्बनडाय ऑक्‍साईड, सल्फरडाय ऑक्‍साईडचे प्रमाण वाढल्याने तातडीने उपाययोजना करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला नोटीस बजावली आहे. त्यानुसार कृती आराखडा तयार करून नियंत्रण मंडळाला सादर करण्यात आल्याचे महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी सांगितले. 

औरंगाबाद - शहराच्या प्रदूषणाने धोकादायक पातळी गाठली असून, हवेतील धूलिकण, कार्बनडाय ऑक्‍साईड, सल्फरडाय ऑक्‍साईडचे प्रमाण वाढल्याने तातडीने उपाययोजना करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला नोटीस बजावली आहे. त्यानुसार कृती आराखडा तयार करून नियंत्रण मंडळाला सादर करण्यात आल्याचे महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी सांगितले. 

शहरातील अनेक मुख्य रस्त्यांची गेल्या काही वर्षांत वाट लागलेली आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त असून, त्यात आता प्रदूषणाची भर पडत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने याबाबत महापालिकेला नोटीस बजावली आहे. त्यात मंडळातर्फे एस. बी. कॉलनी, जिल्हा न्यायालय परिसर, कडा कार्यालय परिसरातील हवेचे नमुने घेतले असता, त्यात धूलिकणांचे प्रमाण जास्त आढळून आले. त्याचबरोबर कार्बनडाय ऑक्‍साईड, सल्फरडाय ऑक्‍साईड या विषारी वायूनेदेखील धोकादायक पातळी गाठली आहे. शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे असून, त्यामुळे धुळीचे प्रमाण वाढत आहे. खासगी वाहनांची संख्या जास्त असल्यानेदेखील प्रदूषणात वाढ होत असल्याचे नियंत्रण मंडळाने नोटिसीत नमूद केले आहे. मंडळाच्या या नोटिसीची दखल घेत महापालिकेच्या वतीने प्रदूषण कमी करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यात आगामी काळात शहर परिसरात हरितपट्टे तयार करण्यात येणार असून, स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सार्वजनिक वाहतुकीसाठी उपाययोजना करण्यात येणार आहे. खड्डे बुजविण्यासाठी तसेच रस्त्यावरील धूळ कमी करण्यासाठी तातडीने काम सुरू करण्यात येणार असल्याची हमी देण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले. 

एकाच रोड स्वीपरवर मदार 
शहरातील रस्त्यांवर साचणारी धूळ कमी करण्यासाठी महापालिकेने 75 लाख रुपये खर्चून रोड स्वीपर गाडी घेतली आहे. त्यातून रोज केवळ पाच ते दहा किलोमीटर अंतरापर्यंतचे रस्ते स्वच्छ केले जातात. शहराचा विस्तार पाहता, एकच वाहन अपुरे पडत असून, एका रस्त्याची साफसफाई केल्यानंतर पुन्हा त्या रस्त्याच्या नंबर लागण्यासाठी महिना-महिना वाट पाहावी लागते. त्यात या मशिनचा वापर फक्त व्हाईट टॉपिंग व सिमेंट रस्त्यावरच करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: aurangabad news pollution