अचानक तपासणीने रेल्वेतील फुकट्यांची तारांबळ 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

औरंगाबाद - दक्षिण मध्य रेल्वेच्या भरारी पथकाने शनिवारी (ता. आठ) अचानक तपासणी करून जवळपास सहाशे विनातिकीट प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून तब्बल एक लाख ९० हजार रुपयांचा दंड वसूल केला.  

औरंगाबाद - दक्षिण मध्य रेल्वेच्या भरारी पथकाने शनिवारी (ता. आठ) अचानक तपासणी करून जवळपास सहाशे विनातिकीट प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून तब्बल एक लाख ९० हजार रुपयांचा दंड वसूल केला.  

औरंगाबाद, परळी व आदिलाबाद या मार्गावरील रेल्वेतील फुकट्या प्रवाशांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेने भरारी पथक नियुक्त केलेले आहे. नांदेड विभागाच्या परिक्षेत्रातील गाड्यांमध्ये फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पकडून त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम या पथकाने सुरू केली आहे. शनिवारी पहाटे चार वाजतापासून ही धडक मोहीम सुरू करण्यात आली. यामध्ये दिवसभर धावणाऱ्या विविध गाड्यांची तपासणी करून धडक कारवाई करण्यात आली. या मोहिमेत ५८९ विनातिकीट प्रवासी सापडले. त्याचप्रमाणे अनियमित प्रवास करणे, नियमापेक्षा अधिक साहित्य घेऊन प्रवास करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली. अनेक प्रवासी मासिक पास (सिझन तिकीट) घेऊन आरक्षित डब्यात बसल्याचे निदर्शनास आले; तर दूध विक्रेत्यांनी एमव्हीएस तिकीट घेऊन प्रवास करणे अपेक्षित असताना, ते जनरल तिकीट घेऊन प्रवास करत होते, त्यांना समज देण्यात आली. विनापरवाना खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या वीस जणांवर कारवाई करण्यात आली. या जंबो पथकात वाणिज्य व्यवस्थापक नेहा रत्नाकर, सहायक व्यवस्थापक प्रदीप कुमार यांच्यासह ३३ तिकीट तपासणीस, सहा कार्यालयीन कर्मचारी, पाच वाणिज्य निरीक्षक, तीन ट्रॅफिक निरीक्षक, आठ रेल्वे पोलिस सहभागी झाले होते.

Web Title: aurangabad news railway