औरंगाबाद-नगर रेल्वे ठरू शकते उद्योगवृद्धीचा मार्ग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

औरंगाबाद - औरंगाबाद आणि जालन्यातील औद्योगिक क्षेत्रातील माल पश्‍चिम महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात पाठविण्यासाठी महामार्गांचा वापर केला जातो. या वाहतुकीसाठी मोठा खर्चही होतो. हा खर्च या लोहमार्गामुळे मोठ्या प्रमाणात कमी होऊन हा मार्ग उद्योगवृद्धीची नवी वाट ठरू शकेल.

औरंगाबाद - औरंगाबाद आणि जालन्यातील औद्योगिक क्षेत्रातील माल पश्‍चिम महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात पाठविण्यासाठी महामार्गांचा वापर केला जातो. या वाहतुकीसाठी मोठा खर्चही होतो. हा खर्च या लोहमार्गामुळे मोठ्या प्रमाणात कमी होऊन हा मार्ग उद्योगवृद्धीची नवी वाट ठरू शकेल.

औरंगाबाद आणि जालना या दोन शहरांमध्ये असलेल्या उद्योग वसाहतींची आणि त्यातील चालू कारखान्यांची संख्या राज्यातील अन्य औद्योगिक वसाहतींपेक्षा अधिक आहे. या लोहमार्गाने मराठवाडा आणि अहमदनगर या भागांतील औद्योगिक वसाहतींना अवागमन करण्यासाठी स्वस्त पर्याय उपलब्ध होऊ शकतो. औरंगाबाद आणि पुण्यादरम्यान इंटरसिटी रेल्वेचे जाळे या लोहमार्गावर उभारणे शक्‍य आहे. यातून औरंगाबाद-पुणे प्रवास अधिक सोपा, सोयीचा आणि स्वस्त होईल. याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे जालन्यापासून सुरू होणारा हा मार्ग उद्योगांसाठी आणि रेल्वेसाठीही फायद्याचा ठरू शकतो. जालन्यातील स्टील, बियाणे उद्योग वसाहती; तर औरंगाबादेतील नव्याने उभारण्यात येत असलेले करमाड येथील ड्रायपोर्ट, मेडिसीन हब या रेल्वेलाइनवर आहेत. त्यामुळे दळणवळण सोपे व्हायला मदत होणार आहे. याशिवाय औरंगाबादेतील शेंद्रा पंचतारांकित वसाहत, चिकलठाणा, औरंगाबाद एमआयडीसी, वाळूज येथील औद्योगिक क्षेत्र या रेल्वे ट्रॅकवर येणार आहेत. नगर जिल्ह्यातील पांढरी पूल आणि अहमदनगर या औद्योगिक वसाहती या ट्रॅकवर येऊ शकतात. याशिवाय थेट पुण्याकडे रेल्वेमार्ग गेल्यास रांजणगावसारख्या मोठ्या औद्योगिक वसाहतींसाठी दळणवळणाचे साधन तयार होईल. त्यामुळे प्रवासी वाहतुकीतून निघणारा नफा आणि त्याच्या साथीला औद्योगिक क्षेत्राच्या नफ्याचा रतिब किती मिळतो, याची तपासणी व्हायला हवी आणि या मार्गाचा अभ्यास व्हायला हवा. पुण्याच्या पुढेही विस्तृत जाळे असल्याने औरंगाबादेतील उद्योगांना जेएनपीटी किंवा अन्य बंदरांपर्यंत जाण्यासाठी नवा मार्ग उपलब्ध होऊ शकतो. 

औरंगाबाद आणि पुण्यादरम्यान रेल्वेलाइन व्हावी, यासाठी चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चरतर्फे सलग दोन वर्षांपासून पत्रव्यहार सुरू आहे. शनिशिंगणापूरला केवळ धार्मिक महत्त्व आहे; पण औरंगाबाद धार्मिक, पर्यटन आणि उद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. शिवाय शनिशिंगणापूरपेक्षा हे शहर मोठे आहे. त्यामुळे येथून रेल्वेला मोठा फायदा मिळू शकतो. याशिवाय दक्षिणेत जाण्यासाठीचा हा मार्ग मराठवाड्याला फायद्याचा ठरेल.
- प्रसाद कोकीळ, अध्यक्ष, सीएमआय.

पुण्याकडे जाण्यासाठी आजही आपण रस्त्यांचा वापर करतो. त्यामुळे उद्योगांचा मोठा पैसा खर्च होत आहे. हा लोहमार्ग झाल्यास हा पैसा वाचेल आणि सुरक्षित प्रवासही करता येईल. दौंड मार्गानेही जायचे झाल्यास तो औरंगाबादला सोयीचा मार्ग आहे. दाक्षिणात्य कंपन्यांशी संपर्क वाढेल. त्यामुळे येथे नवे उद्योग यायाला चालना मिळेल. आज कंटेनरची रस्त्यावरून होणारी वाहतूक रुळावरून गेली तर रेल्वेला त्याचा फायदाच होणार आहे.
- उमेश दाशरथी, अद्योजक.

औरंगाबादेत आजही निझामकालीन छावणी कार्यरत आहे. येथील शूरवीरांनी अनेक प्रसंगांमध्ये देशासाठी रणांगण गाजविले आहे. आधुनिकतेची कास धरायची झाली; तर संपर्काच्या नवनव्या साधनांची कासही धरायलाच हवी. छावण्यांदरम्यानचे संपर्क आज एखाद्यावेळी गरजेचे वाटत नाही; पण युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास कधी काय गरज पडेल हे सांगता येणार नाही. त्यामुळे केवळ शनिशिंगणापूरपर्यंत न थांबता या रेल्वे लाईनचा अभ्यास औरंगाबादपर्यंत व्हायला हवा.
- सुरेंद्र सुर्वे, निवृत्त कॅप्टन

पर्यटकांची संख्या वाढेल
औरंगाबाद पर्यटनाची राजधानी आहे. आजघडीला शिर्डी आणि औरंगाबादेत येणारे पर्यटक अजिंठा, वेरूळ लेणी, घृष्णेश्‍वर, देवगिरी किल्ला, औरंगाबाद बीबीका मकबरा, पाणचक्‍की, सोनेरी महल, छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयाला भेट दिल्याशिवाय पर्यटक माघारी फिरत नाही. सध्या अस्तित्वात असलेल्या औरंगाबाद- सिकंदराबाद रेल्वे लाईनमुळे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील पर्यटकांची संख्या मोठी आहे; पण अशीच रेल्वेलाईन औरंगाबाद आणि पुण्यादरम्यान अस्तित्वात आली; तर कर्नाटक आणि केरळ येथील भूभागही औरंगाबादशी थेट जोडला जाऊ शकतो. त्यामुळे तेथील पर्यटकांचाही औरंगाबादेत येण्याचा राबता वाढेल. 

औरंगाबादेत असलेले टुरिझम पोटेंशियल पूर्णपणे वापरले जात नाही. येथे अधिकाधिक पर्यटक  यावेत, यासाठी नव्या मार्गांची आवश्‍यकता आहे. औरंगाबाद - शनिशिंगणापूर आणि अहमदनगर रेल्वेलाईन औरंगाबादच्या पर्यटनाला चालना देण्याचे महत्त्वपूर्ण काम करू शकते. सध्या दोन ते तीन लाख पर्यटक दक्षिण भारतातून येतात; पण हा लोहमार्ग झाला तर ही संख्या दुपटीने वाढेल.
- जसवंत सिंग, अध्यक्ष, टुरिझम गिल्ड, औरंगाबाद.

Web Title: aurangabad news railway