मराठवाड्याला रेल्वेचा यंदाही ठेंगाच!  

अनिल जमधडे
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - निजामाच्या जोखडातून मुक्त झालेल्या मराठवाड्याची अवहेलना रेल्वेच्या दरबारी आजही कायमच आहे. मराठवाड्याचे रेल्वेमार्ग पूर्ण करण्यापूर्वीच कागदावर तोटा दाखवण्याचे रेल्वेचे धोरण येथील नागरिकांवर अन्याय करणारे आहे. रोटेगाव - पुणतांबा, जालना - खामगाव, सोलापूर - जळगाव हे मार्ग तोट्यात दाखवले तर सोलापूर पैठणमार्गे जळगाव हा मार्ग लटकता ठेवण्यात आला आहे. माहितीच्या अधिकारातून पुन्हा या बाबी स्पष्ट झाल्याने रेल्वेच्या उदासीनतेबद्दल संताप व्यक्त होत आहे. 

औरंगाबाद - निजामाच्या जोखडातून मुक्त झालेल्या मराठवाड्याची अवहेलना रेल्वेच्या दरबारी आजही कायमच आहे. मराठवाड्याचे रेल्वेमार्ग पूर्ण करण्यापूर्वीच कागदावर तोटा दाखवण्याचे रेल्वेचे धोरण येथील नागरिकांवर अन्याय करणारे आहे. रोटेगाव - पुणतांबा, जालना - खामगाव, सोलापूर - जळगाव हे मार्ग तोट्यात दाखवले तर सोलापूर पैठणमार्गे जळगाव हा मार्ग लटकता ठेवण्यात आला आहे. माहितीच्या अधिकारातून पुन्हा या बाबी स्पष्ट झाल्याने रेल्वेच्या उदासीनतेबद्दल संताप व्यक्त होत आहे. 

जगप्रसिद्ध अजिंठा, वेरूळ, पितळखोरा लेणींचे अजब रहस्य, बिबी का मकबरा, पाणचक्की, कपिलधार यासारख्या पर्यटनस्थळांबरोबरच घृष्णेश्‍वर, औंढा नागनाथ, मन्मथस्वामी यासारखी धार्मिक स्थळे पर्यटक आणि भाविकांना खुणावत असतात. म्हणूनच पुरेशा  सोयीसुविधांचा अभाव असतानाही या भागात येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांची संख्या प्रचंड आहे. असे असताना मराठवाड्याचे रेल्वेमार्ग तोट्यात दाखवण्याचे काम रेल्वे प्रशासन करत आहे. मराठवाडा रेल्वे विकास समितीचे ओमप्रकाश वर्मा यांनी माहितीच्या अधिकारात मिळवलेली माहिती मराठवाड्यासाठी धक्कादायक आहे. नगर, बीड, परळी हा एकमेव मार्ग सन २०२१ पर्यंत पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. बाकी सर्वच मार्गांचे मात्र भिजत घोंगडे कायम राहिले आहे. त्यामुळे येथील खासदार व लोकप्रतिनिधींनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

काय आहे, परिस्थिती
नगर-बीड-परळी : हा रेल्वेमार्ग वर्षानुवर्षे रखडला आहे. २६१.२५ किलोमीटरचा २२७१.५० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला १९९५-९६ मध्ये मंजुरी मिळालेली आहे. आतापर्यंत अवघे चाळीस टक्के काम झाल्याचे रेल्वेने मान्य केले. सन २०१७-१८ मध्ये नारायणडोह ते सोलापूरवाडी असे तेवीस किलोमीटर काम होईल. सन २०१९-२० मध्ये सोलापूरवाडी ते बीड असे १३३.५ किलोमीटरचे काम होईल, त्यानंतर सन २०२०-२१ मध्ये बीड ते परळी असे ९२ किलोमीटरचे काम होण्याची अपेक्षा आहे. 

वर्धा-नांदेड (यवतमाळ, पुसद मार्गे) : हा २८४ किलोमीटरचा रेल्वेमार्ग आहे. सन २००८-०९ मध्ये याला मान्यता मिळालेली आहे. सुरवातीला २४९१.४३ कोटी रुपयांचा हा प्रकल्प ३१६८.२९ कोटी रुपयांवर जाऊन ठेपला आहे. आतापर्यंत अवघे आठ टक्के काम झाले आहे. सन २०१७ ते २०१९ अशा दोन वर्षात काम केले जाणार नाही, मात्र सन २०१९-२० मध्ये वर्धा ते कळंब या चाळीस किलोमीटरचे काम होईल. त्यानंतर सन २०२०-२१ मध्ये कळंब, यवतमाळ, दारवा अशा ७६ किलोमीटरचे काम होणार असून, त्यानंतर काम अर्धवट राहील, अशी माहिती रेल्वेने दिली आहे. 

मनमाड - मालेगाव - धुळे - इंदौर : या प्रत्यक्ष मार्गाचे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे. संपूर्ण प्रकल्प अहवाल तयार करुन मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात आलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या अर्थसंकल्पात या प्रकल्पाला मंजुरी मिळण्याची शक्‍यता आहे.
ठेंगा दाखवलेले प्रकल्प 

पुणतांबा - रोटेगाव : पुणतांबा ते रोटेगाव हा केवळ २७ किलोमीटरचा मार्ग पूर्ण झाल्यास पश्‍चिम महाराष्ट्र आणि शिर्डी हे धार्मिक स्थळ मराठवाड्याशी जोडले जाणार आहे. मात्र या मार्गाचेही सन २००९ पासून भिजत घोंगडे अद्याप कायम आहे. यासाठी फेरसर्वेक्षणाचे काम हाती घेतले आहे. मात्र हा मार्ग उणे ५ टक्के तोट्यात दाखवला असल्याने या मार्गाला नेमकी मंजुरी केव्हा मिळेल हे सांगता येणे अवघड आहे. 

जालना-खामगाव : जालना - खामगाव या १५५ किलोमीटरच्या रेल्वेमार्गाला सन २०१०-११ मध्ये सर्वेक्षणाला सुरवात करण्यात आली. सर्वेक्षण करुन डिसेंबर २०१२ मध्ये रेल्वे बोर्डाला अहवाल सादर करण्यात आला. हा रेल्वेमार्गही उणे ४.२६ टक्के तोट्यात दाखवलेला असल्याने, त्यावर आजपर्यंत कुठलाही निर्णय न घेता प्रलंबित ठेवलेला आहे. 

सोलापूर - जालना - जळगाव : हा ४५२.८ किलोमीटरचा रेल्वेमार्गाचा प्रस्ताव मार्च २०१३ मध्ये रेल्वे बोर्डाला सादर करण्यात आलेला असून, हा ३२३७.९७ कोटी रुपयांचा रेल्वेमार्ग उणे ५.६९ टक्के तोट्यात दाखवला आहे. त्यावरही काहीही निर्णय घेण्यात आलेला नाही. 

सोलापूर - पैठण - औरंगाबाद - अजिंठा - जळगाव : या महत्वपूर्ण रेल्वेमार्गासाठी अद्याप कुठलेही पाऊल उचलण्यात आलेले नाही. या मार्गासाठी ओमप्रकाश वर्मा यांनी औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिकाही दाखल केलेली असून, त्यावर सुनावणी प्रलंबित आहे.

Web Title: aurangabad news railway marathwada