रेल्वेस्थानकावर अधिकाऱ्यांची गुंडागर्दी 

रेल्वेस्थानकावर अधिकाऱ्यांची गुंडागर्दी 

औरंगाबाद - दक्षिण मध्य रेल्वेतर्फे गुरुवारी (ता. दोन) फुकट्या प्रवाशांच्या विरोधात कारवाई करण्यात आली. मात्र कारवाईमध्ये अरेरावी करून अक्षरश: गुंडागर्दी करण्यात आल्याने रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात आला. प्रवाशांच्या बरोबरच वार्तांकनासाठी गेलेले माध्यम प्रतिनिधी व छायाचित्रकारांना अधिकाऱ्यांनी दोन तास अडकावून ठेवत मनमानीचा कळसच गाठला. 

मराठवाड्यातून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमधून मोठ्या प्रमाणावर फुकटे प्रवासी असतात, असा दक्षिण मध्य रेल्वेप्रशासनाचा दावा आहे. फुकट्या प्रवाशांमुळे रेल्वेच्या उत्पन्नावर परिणाम होत असल्याने गुरुवारी दमरेच्या पथकाने औरंगाबाद आणि परिसरात कारवाईचा बडगा उगारला. मात्र ही कारवाई करताना अधिकाऱ्यांनी गुंडागर्दीचेच दर्शन घडवत प्रवाशांचा अक्षरश: छळ केला. सकाळी नगरनाका येथे रेल्वे थांबून अधिकाऱ्यांनी तिकीट तपासणी सुरू केली. ही तपासणी करताना अरेरावीची भाषा आणि मनमानीचा कळस गाठल्या जात होता. तिकीट नसलेल्या प्रवाशांची अक्षरश: कॉलर धरून, केस पकडून, कंबरेच्या बेल्टला पकडून सराईत गुन्हेगारांप्रमाणे ओढून नेण्यात येत होते. दुपारी तीनच्या सुमारास रेल्वेस्थानकावर कारवाई सुरू करण्यात आली. 

यावेळी तर अक्षरश: कहर करण्यात आला. कुटुंबाचे एकत्रित तिकीट असलेला प्रवासी पाणी आणण्यासाठी गेला किंवा अन्य काही खाद्यपदार्थ आणण्यासाठी गेले, त्यांनाही पकडून ठेवण्यात आले. आमच्याकडे तिकीट आहे, पत्नी फलाटावर बसली हे सांगणाऱ्या प्रवाशांचे ऐकून घेण्याचीही तसदी पथकातील अधिकारी घेत नव्हते. गयावया केल्यानंतर तासाभराने प्रवाशाच्या कुटुंब बसलेल्या ठिकाणी त्या प्रवाशांना नेऊन तिकीट असल्याची खात्री करून सोडण्यात आले. नेमके किती प्रवाशांच्या विरोधात कारवाई केली हे सांगण्यास अधिकारी तयार नव्हते. त्यामुळे एकूणच कारवाईबद्दल संशय व्यक्त करण्यात येत होता. 

पत्रकारांनाही ठेवले बसवून
रेल्वेची मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू असल्याने विविध दैनिकांचे पत्रकार व छायाचित्रकार रेल्वेस्थानकावर पोचले. मात्र त्यांना फोटो काढत असतानाचा पकडण्यात आले, तिकीट कुठे आहे, तुम्ही परवानगी घेतली नाही, असे म्हणून अरेरावी सुरू केली. पत्रकार असल्याचे सांगितल्यानंतरही पथकातील अधिकारी ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. जवळपास तासभर पत्रकारांना अडवून ठेवण्यात आले. कारवाई पारदर्शक असेल तर अधिकाऱ्यांना पत्रकारांची भीती वाटण्याचे कारण नाही. मात्र एकूणच कारवाईबद्दल संशय निर्माण व्हावा, अशा पद्धतीने ही कारवाई करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com