पुंडलिकनगरात पाणीच पाणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

औरंगाबाद - शहरात गुरुवारी (ता. आठ) झालेल्या जोरदार पावसाने पुंडलिकनगरासह अनेक भागांतील अपार्टमेंटचा तळमजला, घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरले. झांबड इस्टेट भागात एक झाड पडले. दरम्यान, महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेच्या नियोजनशून्यतेमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. अग्निशमन जवानांनी धावपळ करीत पावसाचे पाणी बाहेर काढले. 

औरंगाबाद - शहरात गुरुवारी (ता. आठ) झालेल्या जोरदार पावसाने पुंडलिकनगरासह अनेक भागांतील अपार्टमेंटचा तळमजला, घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरले. झांबड इस्टेट भागात एक झाड पडले. दरम्यान, महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेच्या नियोजनशून्यतेमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. अग्निशमन जवानांनी धावपळ करीत पावसाचे पाणी बाहेर काढले. 

 बुधवारी (ता. सात) विद्यानगर भागात शुभम अपार्टमेंटमधील काही दुकानांत पाणी शिरले. ते काढताना अग्निशमनच्या बंबाचा पंप बंद पडला. त्यामुळे ऐनवेळी दुसरा बंब मागवावा लागला होता. गुरुवारी दुपारी मुसळधार पाऊस  आला. त्यामुळे पुंडलिकनगरातील श्रीरंग प्लाझा, सारंग आपर्टमेंटचा तळमजला आणि रुईकल हेल्थ क्‍लबमध्ये पाणी शिरले. दरम्यान, रहिवाशांनी अग्निशामक दलाला वारंवार फोन केले; पण मदत मिळत नसल्यामुळे रहिवाशांनी नगरसेवक राजू वैद्य यांना कळविले. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अग्निशामक विभागाच्या जवानांना तातडीने बोलावून घेतले. यानंतर जवानांनी पंप लावून पाणी काढले. या वेळी नगरसेवक मनोज गांगवे, उपशहरप्रमुख दिग्विजय शेरखाने, उपशहरप्रमुख ज्ञानेश्‍वर डांगे उपस्थित होते. दरम्यान, उस्मानपुऱ्यातील उत्सव मंगल कार्यालयातही पाणी शिरले. झांबड इस्टेटमध्ये रेणुका माता मंदिराजवळ एक झाड या पावसात कोसळल्याचे या विभागाकडून सांगण्यात आले. 

नूर कॉलनीतून पथक हात हलवत परत
महापालिका मुख्यालयाच्या टप्पा क्रमांक तीन इमारतीच्या पाठीमागेच असलेल्या नूर कॉलनीत दर पावसाळ्यात अनेक घरांमध्ये पाणी शिरते. भूमिगत गटार योजनेचे काम करताना नूर कॉलनीतील नाल्यात मातीचा भराव टाकल्याने अनेक घरे खोल गेली आहेत. या भागातील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे येथील काही नागरिकांनी मातीचा भराव काढून घेण्याची मागणी केली. यामुळे महापालिकेचे कार्यकारी अभियंता अफसर सिद्दिकी पथकासह जेसीबी मशीन घेऊन नूर कॉलनीत गेले; मात्र ज्या नागरिकांना पावसाच्या पाण्याचा धोका नाही त्यांनी मातीचा भराव काढण्याला विरोध केला. यामुळे हे पथक हात हलवत परत आले. त्यामुळे काही घरांना पावसाच्या पाण्याचा धोका कायम आहे. 

प्रत्येक झोनमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन केल्याचे महापालिका सांगत आहे; पण प्रत्यक्षात आपातकालीन व्यवस्था कोलमडलेली आहे. पाऊस पडल्यावरच अग्निशामक दलाचे जवान धावपळ करतात. प्रत्येक वॉर्ड कार्यालयातील जवाबदार अभियंते, वॉर्ड अधिकारी, कनिष्ठ कर्मचारी आणि मजूर वर्ग गायब असल्याचे दिसते. आयुक्तांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची झाडाझडती घ्यावी म्हणजे वस्तुस्थिती लक्षात येईल.
- राजू वैद्य, नगरसेवक

Web Title: aurangabad news rain