सत्ताधारी रावण तर सदाभाऊ हनुमानः शेट्टी

सुषेन जाधव
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

औरंगाबादः सितेचा शोध घेण्यासाठी सदाभाऊ खोत यांना हनुमान म्हणून लंकेत पाठविले होते, सत्ताधारी रावणाच्या प्रभावामुळे ते वापस येऊ शकले नाहीत, असा टोला खासदार राजू शेट्टी यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना लगावला.

औरंगाबादः सितेचा शोध घेण्यासाठी सदाभाऊ खोत यांना हनुमान म्हणून लंकेत पाठविले होते, सत्ताधारी रावणाच्या प्रभावामुळे ते वापस येऊ शकले नाहीत, असा टोला खासदार राजू शेट्टी यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना लगावला.

औरंगाबादेत पत्रकार परिषदेत आज (बुधवार) ते बोलत होते. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून त्यांना कर्जमुक्त करणे हेच आपले उद्दीष्ट आहे. उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमीभाव, नुकसान भरपाई मिळावी यासाठी राज्यभर दौरे करत आहेत. सध्या कुठल्या वादात पडण्याऐवजी शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणार असल्याची सावध भूमिकाही यावेळी त्यांनी मांडली. यावेळी वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, प्रकाश पोकळे, संतोष सूर्यवंशी, गजानन पाटील उपस्थित होते.

सरकारला गुडघे टेकायलाच लावणार
शेतमालाचा दर पडल्यास सरकार बाजारात हस्तक्षेप करते. मात्र सध्याची धोरणांचा दलालानांच फायदा होत आहे. मग ही धोरणे ठरविणारी मंडळी कोण? असा सवालही शेट्टी यांनी केला. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा आणि स्वामिनाथन आयोगाप्रमाणे उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमीभाव द्यावा अन्यथा केंद्र, राज्य सरकारला शेतकऱ्यांसमोर गुडघे टेकायलाच लावू असा इशाराही त्यांनी दिला.

मराठवाड्यातील सोयाबीन, कपाशीचे नुकसान झाले असून, विम्याचा परतावा मिळण्यासाठी पंचनामाने करण्यास सरकार उदासीन आहे. स्वाभिमानी संघटनेने तुरीचा घोटाळा उघडकीस आणला तसाच उडीद, मुगाची अल्प दराने होणारी खरेदी व त्यात झालेला घोटाळा बाहेर काढू असा इशारा त्यांनी दिला. देशातील 170 शेतकरी संघटना कर्जमुक्ती आणि हमीभावासाठी एकत्र आल्या आहेत. यातून अखिल भारतीय किसान समन्वय संघर्ष समिती स्थापन करण्यात आली असून, व्ही. एम. सिंग (उत्तरप्रदेश), योगेंद्र यादव, रामपाल जाट, डॉ. सुनिलम आदींचा सहभाग असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे अर्ज भरून घेतले मात्र जाणीवपूर्वक पैसे जमा केले नाहीत, शेतकऱ्यांची इत्थंभूत माहिती सरकारकडे आहे, मात्र राज्य सरकार केवळ वेळकाढूपणा करत असल्याचा आरोपही शेट्टी यांनी केला.

जपून जा ः राणेंना शेट्टींचा सल्ला
नारायण राणेंच्या राजकीय हालचालींविषयी राजू शेट्टी यांना पत्रकारांनी छेडले असता जाताना जपून जा, सितेचा शोध घ्यायच्या भानगडीत पडू नका, असा सल्ला शेट्टी यांनी नारायण राणे यांना दिला. सदाभाऊ आणि शेट्टी यांच्यातील वादावर पडदा पडला का? असे विचारले असता ते कच्चे लिंबू आहेत, आणि परिवर्तनाच्या चळवळीतून कच्चे लिंबू बाहेर पडतात असे वक्तव्य त्यांनी केले. शेतकरी बोगस नाहीत तर चंद्रकांत पाटीलच बोगस मंत्री आहेत, या आरोपाचा त्यांनी पुर्नउच्चार केला.

Web Title: aurangabad news raju shetty political attack on sadabhau khot