कर्जमाफीवर शिवसेना काहीअंशी समाधानी: रामदास कदम

राजेभाऊ मोगल 
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

राज्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलने केल्यानंतर साडेतीन महिन्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 34 हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली. त्यानंतर आधार क्रमांकासह ऑनलाईन अर्ज दाखल करीत शेतकऱ्यांची नोंद करून घेतली. त्यानंतर पात्र शेतकऱ्यांची निवड करण्यात आली.

औरंगाबाद : तत्वत:, निकषांसह नव्हे तर मार्च 2017 पर्यंत सरसकट कर्जमाफी द्या, यासाठी शिवसेनेनी रान उठविले. मात्र, निकषासह जाहिर कर्जमाफीच्या लाभाचे प्रमाणपत्र शिवसेनेच्या मंत्र्यांच्याच हस्ते शेतकऱ्यांना वाटण्यात आले. दरम्यान, याबाबत आम्ही काही अंशीच समाधानी असल्याची भावना पालकमंत्री रामदास कदम यांनी व्यक्‍त केली. शिवाय, आमची शेतकऱ्यांशी बांधीलकी असल्याने मार्च 2016 पर्यंतच नव्हे 2017 पर्यंत कर्जमाफी द्यावी, यावर आमची चर्चा सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. 

राज्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलने केल्यानंतर साडेतीन महिन्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 34 हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली. त्यानंतर आधार क्रमांकासह ऑनलाईन अर्ज दाखल करीत शेतकऱ्यांची नोंद करून घेतली. त्यानंतर पात्र शेतकऱ्यांची निवड करण्यात आली. या विषयावरुन राज्यात सरकार विरुद्ध शेतकरी असा सामनाही रंगल्याचे पाहायला मिळाले. कर्जमाफी दिवाळीपूर्वीच देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी चार दिवसापूर्वीच केली होती. त्यानुसार बुधवारी राज्यभरात याबाबत उपक्रम घेण्यात आले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (ता. १८) श्री. कदम यांच्या हस्ते जिल्ह्यातील 21 शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

त्यानंतर पत्रकारांशी बोलताना श्री. कदम म्हणाले, की मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत, तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कर्जमाफीबद्दल आश्‍वासन दिले होते. काहीअंशी का होईना त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. याला ऐतिहासीक दिवसही म्हणता येईल. कर्जमाफीवर आंदोलने केल्यानंतर आमच्यावर लोकांनी टीका केली होती. सत्तेत असूनही रस्त्यावर उतरता, असे म्हणाले होते. मात्र, आमची बांधिलकी शेतकऱ्यांसोबत असल्यामुळेच रस्त्यावर उतरून आंदालने केली. आज शेतकऱ्यांना न्याय मिळतोय. 2016पर्यंतच कर्जमाफी दिली असली तरी आता मार्च 2017 पर्यंतची कर्जमाफी द्यावी, यासाठी आमची चर्चा सुरु असून मुख्यमंत्री त्याबाबत सकारात्मक आहेत. शिवाय, हे यश कुणाचे, असा प्रश्‍न विचारला असता, ते संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, असे सांगत कर्जमाफी ऐन दिवाळीत होतेय याचे आम्हाला समाधान असल्याचे त्यांनी नमुद केले.

Web Title: Aurangabad news Ramdas Kadam statement on farmer loan waiver