आणखी १३ धार्मिक स्थळांची पाडापाडी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेची शहरात अनधिकृत धार्मिक स्थळांच्या विरोधातील मोहीम सुरूच असून, गुरुवारी (ता. तीन) १३ ठिकाणी कारवाई करण्यात आली. खिंवसरा पार्क येथे सिद्धिविनायक गणेश मंदिर पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध करत हुसकावून लावले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. काचीवाडा येथे म्हसोबा मंदिर हटविण्यासदेखील नागरिकांनी विरोध केला. त्यामुळे एक दिवसाचा वेळ देण्यात आला. 

औरंगाबाद - न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेची शहरात अनधिकृत धार्मिक स्थळांच्या विरोधातील मोहीम सुरूच असून, गुरुवारी (ता. तीन) १३ ठिकाणी कारवाई करण्यात आली. खिंवसरा पार्क येथे सिद्धिविनायक गणेश मंदिर पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध करत हुसकावून लावले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. काचीवाडा येथे म्हसोबा मंदिर हटविण्यासदेखील नागरिकांनी विरोध केला. त्यामुळे एक दिवसाचा वेळ देण्यात आला. 

शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांच्या विरोधात महापालिकेने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार मोहीम सुरू केली आहे. दुसऱ्या आठवड्यातदेखील ही कारवाई सुरूच असून, गुरुवारी तब्बल तेरा ठिकाणी कारवाई करण्यात आली. उपअभियंता वसंत निकम यांच्या पथकाने सकाळीच मोंढा नाका येथे गेल्या अनेक वर्षांपासून वाहतुकीला अडथळा ठरणारा दर्गा हटविला. त्यानंतर हे पथक खिंवसरा पार्क येथे सकाळी अकरा वाजताच्या सुमारास सिद्धिविनायक मंदिर हटविण्यासाठी पोचले तेव्हा मंदिरात पूजा चालू होती. यापूर्वीच दोनवेळा हे मंदिर हटविण्यासाठी उपमहापौर स्मिता घोगरे यांच्या विनंतीनुसार वेळ देण्यात आला होता. मात्र, मूर्ती काढण्यासाठी पूजा सुरू असल्याचे सांगत पथकाला कारवाईसाठी यावेळीदेखील विरोध करण्यात आला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, शहरप्रमुख विजय वाघचौरे यांच्यासह नगरसेवक नितीन साळवी, सिद्धांत शिरसाट, संजय बारवाल, अनिल लहाने व इतरांनी पथकाला अडविले. आम्ही स्वतः होऊन मंदिर हटवत असताना तुम्ही इथे येतात कशाला? असा सवाल करत, मंदिराला तुम्हाला हात लावू देणार नाही, असा पवित्रा श्री. दानवे यांनी घेतला. पथकाला यावेळी शिवराळ भाषाही वापरण्यात आली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवसैनिकांनी त्यांनाही जुमानले नाही. त्यामुळे महापालिकेच्या पथकाने माघार घेतली. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास हे मंदिर काढून घेण्यात आले. 

उपायुक्त रवींद्र निकम यांच्या पथकाने ज्युबली पार्क येथील महापालिकेच्या जागेवर असलेला दर्गा, सेंट्रल नाका येथील चार कबरी, फकीरवाडी येथील मुंजा मंदिर हटविले. उपायुक्त अयूब खान यांच्या पथकाने पोलिस मुख्यालयाजवळील दोन दर्गा, अंबा-अप्सरा चित्रपटगृहाजवळील सादात दर्गा, पानदरिबा येथील अस्थाना हटविली. पानदरिबा येथे काही व्यापाऱ्यांनी अस्थाना हटविण्यास विरोध केला. मात्र त्याला न जुमानता ही कारवाई करण्यात आली.

जिल्हा न्यायालयातील दर्गा भुईसपाट
जिल्हा न्यायालय परिसरातील दर्गा उपअभियंता एम. बी. काझी यांच्या पथकाने जमीनदोस्त केला. जिल्हा न्यायालयाच्या नव्या इमारतीचे बांधकाम करताना संबंधित कंत्राटदाराने या दर्गाचे बांधकाम करून दिले होते. त्यावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील खंडपीठाने स्युमोटो याचिका दाखल करून घेतली होती. तसेच या पथकाने चिकलठाणा येथे जालना रोडवर असलेला दर्गा हटविला. त्यानंतर हे पथक काचीवाडा येथे म्हसोबा मंदिर हटविण्यासाठी गेले असता, नागरिकांनी विरोध करत आम्ही स्वतः होऊन मंदिर काढून घेऊ, त्यासाठी वेळ देण्याची मागणी केली. त्यानुसार एक दिवसाचा वेळ देण्यात आला. 

ओ माय फ्रेन्ड गणेशा... 
खिंवसरा पार्क येथील गणेशमूर्ती हटविताना उपमहापौर स्मिता घोगरे यांचा मुलगा युवराज याला रडू कोसळले. एका पोलिस अधिकाऱ्याने त्याला तुझ्या बाप्पाला आम्ही घेऊन चाललो, असे म्हणताच तो रडतच पळत मूर्तीजवळ गेला. हे वातावरण पाहून सर्वच जण भावूक झाले. 

Web Title: aurangabad news Religious place