आणखी दहा अनधिकृत धार्मिक स्थळांवर हातोडा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांच्या विरोधात महापालिकेची मोहीम सुरूच असून, सोमवारी दहा ठिकाणी कारवाई करण्यात आली. त्यात नऊ मंदिरांसह एका दर्ग्याचा समावेश आहे. उल्कानगरी येथील गणेश मंदिर व इतर खासगी जागेवर असलेल्या मंदिरांना काही काळासाठी अभय देण्यात आले. 

औरंगाबाद - न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांच्या विरोधात महापालिकेची मोहीम सुरूच असून, सोमवारी दहा ठिकाणी कारवाई करण्यात आली. त्यात नऊ मंदिरांसह एका दर्ग्याचा समावेश आहे. उल्कानगरी येथील गणेश मंदिर व इतर खासगी जागेवर असलेल्या मंदिरांना काही काळासाठी अभय देण्यात आले. 

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार महापालिकेने शुक्रवारपासून शहरात अनधिकृत धार्मिक स्थळांच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात रस्त्यावर अतिक्रमण करून उभारण्यात आलेली २३ धार्मिक स्थळे हटविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यापैकी २० ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात सोमवारपासून (ता. ३१) महापालिकेच्या मोकळ्या जागेवर व हरितपट्ट्यात असलेली २४ अनधिकृत धार्मिकस्थळे हटविण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार सकाळी साडेअकराला महापालिकेने तयार केलेली चार पथके एकाच वेळी बाहेर पडली. उपायुक्त अयुब खान यांच्या पथकाने सिडको एन-पाच येथे खेळाच्या मैदानावर उभारण्यात आलेले तीन बाय पाच फुटांचे बांधकाम असलेले मंदिर दुपारी साडेबाराच्या सुमारास जमीनदोस्त केले. यावेळी या मंदिराची कोणाला अडचण नाही, तक्रार नाही, त्यामुळे कारवाई करू नये, अशी मागणी नागरिकांनी केली; मात्र त्यांचा विरोध मावळताच अर्ध्या तासात ही कारवाई पूर्ण करण्यात आली. 

ठाकरेनगरात तणाव 
सिडको एन-दोन भागातील ठाकरेनगरात श्री दुर्गामाता मंदिर हटविण्यावरून काही काळ तणाव निर्माण झाला होता. श्रावण महिन्यानिमित्त या ठिकाणी स्वामी समर्थ पाठाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी सव्वाला उपअभियंता वसंत निकम यांचे पथक या ठिकाणी पोचले. त्यावेळी महिला पूजापाठ करत होत्या. त्यामुळे नगरसेवक भाऊसाहेब जगताप व माजी नगरसेवक दामू अण्णा शिंदे यांनी सात ऑगस्टपर्यंत मंदिरात धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यानंतर आम्ही स्वतःहून मंदिर काढून घेऊ, तोपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केली. मात्र, पथकाने प्रथम मंदिराची वीज तोडली व महिला, भाविकांना परिसर पाच मिनिटांत रिकामा करण्याचे आदेश दिले. पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करत जमावाला दूर केले. त्यानंतर मंदिर जमीनदोस्त करण्यात आले. यावेळी मंदिरात दररोज पूजा करण्यासाठी येणाऱ्या महिलांना अश्रू आवरता आले नाहीत. त्यामुळे वातावरण गंभीर बनले होते. १९९४ मध्ये या मंदिराची स्थापना करण्यात आली होती. 

आविष्कार कॉलनीत विरोध  कायम, रात्री झाली कारवाई   
आविष्कार कॉलनी येथील हनुमान मंदिर हटविण्यासाठी दुपारी चारला महापालिकेचे पथक तेथे गेले होते. तेथे नागरिकांनी पुन्हा विरोध केला. दरम्यान, स्वत:हून शेड काढले. मात्र त्यानंतर दोन तास मूर्ती हटविण्यात आली नाही. नागरिक सहकार्य करत नसल्याने अयुब खान, जयंत खरवडकर यांनी नागरिकांशी चर्चा करुन मूर्ती काढायला लावली. त्यानंतर जेसीबीने रात्री आठला मंदिर पाडले.

तीन ठिकाणी दिली मुदत
दिवसभरात महापालिकेच्या चार पथकांमार्फत दहा ठिकाणी कारवाया करण्यात आल्या. त्यात नारळीबाग येथील हनुमान मंदिर, जळगाव रोडलगत व बारापुल्ला भागात असलेले मांगीरबाबा मंदिर, रेल्वेस्टेशन एमआयडीसी परिसरातील काळभैरव मंदिर, एकनाथनगर येथील ओंकारेश्‍वर मंदिर, स्वातंत्र्यसैनिक कॉलनी येथील मोहिनीराज मंदिर, शिवाजी कॉलनीतील महादेव मंदिराचा समावेश आहे. मुकुंदवाडी भागात व राजीव गांधीनगर भागात खासगी जागेवर अनुक्रमे वरखेडी देवी व हनुमान मंदिराला मात्र खासगी जागेवर असल्यामुळे काही काळ अभय देण्यात आले. उल्कानगरी येथील गणेश मंदिरालादेखील एक दिवसाचा वेळ देण्यात आला. नागरिकांनी स्वतःहून मंदिर काढून घेण्यासाठी वेळ देण्याची मागणी केली होती.

Web Title: aurangabad news Religious place encroachment