शंभर कोटींच्या रस्तेकामाचा ऑगस्टमध्ये फुटणार नारळ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जुलै 2017

औरंगाबाद - राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आलेल्या १०० कोटींच्या निधीतून प्रत्यक्षात रस्त्यांच्या कामाला ऑगस्टमध्ये सुरवात होण्याची शक्‍यता आहे. महापालिका आयुक्‍त डी. एम. मुगळीकर यांनी शनिवारी (ता. एक) माध्यम प्रतिनिधींशी बोलताना असे संकेत दिले.

औरंगाबाद - राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आलेल्या १०० कोटींच्या निधीतून प्रत्यक्षात रस्त्यांच्या कामाला ऑगस्टमध्ये सुरवात होण्याची शक्‍यता आहे. महापालिका आयुक्‍त डी. एम. मुगळीकर यांनी शनिवारी (ता. एक) माध्यम प्रतिनिधींशी बोलताना असे संकेत दिले.

दोन दिवसांपूर्वीच या निधीतून काम होणाऱ्या रस्त्यांची रस्त्यांची यादी अंतिम करून त्यास सर्वसाधारण सभेची तांत्रिक मान्यता घेऊन त्यासंबंधीचा प्रस्ताव महापालिकेला शासनाकडे पाठवावा लागणार आहे. त्यानंतरच या रस्त्यांसाठी शासनाकडून महापालिकेला निधी प्राप्त होणार आहे. यासंबंधीचे निर्देश शनिवारी (ता. एक) जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झाले आहेत. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात रस्त्यांची कामे सुरू होणे अपेक्षित आहे.

आयुक्त मुगळीकर यांनी सांगितले, की शंभर कोटींच्या निधी मंजुरीचे पत्र महापालिकेला प्राप्त झाले आहे. या पत्रात नमूद केल्याप्रमाणे २०१७-१८ साठी हा निधी मंजूर झाला आहे. मंजूर निधीतून ज्या रस्त्यांची कामे करावयाची आहेत त्यांची यादी अंतिम करून त्यास सर्वसाधारण सभेची तांत्रिक मान्यता घ्यावी लागणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविण्याचे सूचित करण्यात आले आहे.

महापालिकेने पाठविलेला प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शासनाकडे जाईल. तो शासनाकडे गेल्यानंतर मंजूर निधीप्रमाणे टप्प्याटप्प्याने निधी प्राप्त होणार आहे.

तथापि, महापौरांनी सहा महिन्यांपूर्वी सर्वपक्षीय आमदार, पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन जी यादी अंतिम केली होती ती आजपर्यंत समोर आली नाही. मात्र, शासनाने आता रस्त्यांची यादी अंतिम करून त्याची प्राथमिक अंदाजपत्रके तयार करून ती यादी तांत्रिक मान्यतेने पाठविण्याचे निर्देश दिलेले आहेत. यावर आयुक्तांनी पदाधिकारी, नगरसेवकांशी चर्चा करून लवकरच यादी अंतिम करून प्रस्ताव मंजूर करून तो जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविला जाईल, असे स्पष्ट केले.

Web Title: aurangabad news road