चांगले रस्ते वगळा, खराब यादीत घ्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - महापौर भगवान घडामोडे यांनी सादर केलेल्या दीडशे कोटींच्या रस्त्यांच्या यादीवर बुधवारी (ता. दोन) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीतही आक्षेप घेण्यात आला. त्यावर चांगले असलेले रस्ते यादीत आले असतील तर ते एक्‍स्चेंज करून खराब रस्त्यांचा समावेश करण्याचे आदेश सभापती गजानन बारवाल यांनी दिले. 

औरंगाबाद - महापौर भगवान घडामोडे यांनी सादर केलेल्या दीडशे कोटींच्या रस्त्यांच्या यादीवर बुधवारी (ता. दोन) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीतही आक्षेप घेण्यात आला. त्यावर चांगले असलेले रस्ते यादीत आले असतील तर ते एक्‍स्चेंज करून खराब रस्त्यांचा समावेश करण्याचे आदेश सभापती गजानन बारवाल यांनी दिले. 

राज्य शासनाने शहरातील रस्त्यांसाठी महापालिकेला शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र, महापौर भगवान घडामोडे यांनी सोमवारी (ता. ३१) जिल्हाधिकारी कार्यालयाला दीडशे कोटींच्या ५० रस्त्यांची यादी सादर केली. उर्वरित निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल किंवा हे रस्ते डिफर्ड पेमेंटवर (टप्प्याने पैसे देणे) तयार करण्यात येतील, असे महापौरांनी स्पष्ट केले होते. या यादीवर शिवसेना, एमआयएम; तसेच काँग्रेस सदस्यांनी आक्षेप घेतला होता. अनेक चांगल्या रस्त्यांचा यादीमध्ये समावेश करण्यात आला असून यादीतील रस्ते बदलण्याची मागणी महापालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन  करण्यात आली. बुधवारी झालेल्या सभेतही शिवसेनेचे सदस्य सीताराम सुरे यांनी रस्त्यांचा विषय उपस्थित केला. महापालिकेत समाविष्ट झालेल्या १८ गावांतील रस्त्यांवर गेल्या वीस वर्षांत खडीचे एक ट्रॅक्‍टरही टाकण्यात आलेले नाही. या भागातील लाखो नागरिकांना आजही चिखलातून वाट काढत शहरात यावे लागते. अशा दुर्लक्षित रस्त्यांकडे पुन्हा एकदा काणाडोळा करण्यात आला आहे. या रस्त्यांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. 

शेख नर्गीस सलीम, अजिम अहेमद रफिक यांनीही यादीवर आक्षेप घेतला. सिद्धांत शिरसाट यांनी एमआयटी ते सातारा मंदिर या रस्त्याच्या कामाची प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे हा रस्ता वगळण्यात यावा, अशी मागणी केली. संगीता वाघुले यांनी आपल्या वॉर्डातील मिसारवाडी ते आरतीनगर अशी रस्त्याच्या नावात दुरुस्ती करण्याची मागणी केली. सदस्यांच्या चर्चेनंतर सभपतींनी चांगले असलेले रस्ते यादीत आले असतील तर ते एक्‍स्चेंज करून अत्यंत खराब असलेल्या रस्त्यांचा यादीत समावेश करण्यात यावा, असे आदेश दिले.

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला रस्त्यांचा आढावा 
महापौरांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दीडशे कोटींच्या ५० रस्त्यांची यादी सादर केल्यामुळे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी बुधवारी महापालिकेच्या शहर अभियंत्याकडून आढावा घेतला. शहर अभियंता सिकंदर अली यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: aurangabad news road amc