लक्षण फटीचर, नाव व्हीआयपी! 

आदित्य वाघमारे 
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - मंत्र्यांच्या येण्या-जाण्याच्या मुख्य मार्गाच्या केवळ नावात ‘व्हीआयपी’ शिल्लक आहे. सहा किलोमीटरच्या या मार्गावर एकदा प्रवास करताना पार करावे लागणारे ९३९ खड्डे हा रस्ता फटीचर झाल्याचा प्रत्यय देतात. ‘सकाळ’ने मंगळवारी (ता. २६) केलेल्या या मोजणीत दिसून आलेले खड्डे वाहनधारकांना प्रचंड त्रासदायक ठरत आहेत. 

औरंगाबाद - मंत्र्यांच्या येण्या-जाण्याच्या मुख्य मार्गाच्या केवळ नावात ‘व्हीआयपी’ शिल्लक आहे. सहा किलोमीटरच्या या मार्गावर एकदा प्रवास करताना पार करावे लागणारे ९३९ खड्डे हा रस्ता फटीचर झाल्याचा प्रत्यय देतात. ‘सकाळ’ने मंगळवारी (ता. २६) केलेल्या या मोजणीत दिसून आलेले खड्डे वाहनधारकांना प्रचंड त्रासदायक ठरत आहेत. 

सुभेदारी विश्रामगृह, विभागीय आयुक्तालय, जिल्हाधिकारी कार्यालय असलेल्या व्हीआयपी रोडवर मंत्रिमहोदय आणि ज्येष्ठ अधिकाऱ्यांचा कायम राबता असतो. रस्त्यावर व्हीआयपी ये-जा करीत असले तरी ही वाट अजिबात व्हीआयपी राहिलेली नाही. जागोजागी पडलेले खड्डे आणि धसलेले रस्ते वाहनधारकांना प्रचंड त्रासदायक ठरत आहेत. गेल्या सुमारे दशकभरापासून या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले नसल्याने केवळ पॅचवर्कवर आतापर्यंत हे खड्डे बुजविले जातात. हर्सूल टी पॉइंट ते बाबा पेट्रोलपंपदरम्यानच्या सहा किलोमीटर मार्गावरील खड्ड्यांची मोजदाद मंगळवारी केली असता, या रस्त्यावर तब्बल ९३९ खड्डे पडले असल्याची धक्कादायक माहिती  समोर आली आहे. यामध्ये हर्सूल टी पॉइंट ते अण्णा भाऊ साठे चौक (जिल्हाधिकारी कार्यालय) दरम्यानच्या रस्त्यावर दोन्ही बाजूंना १०५ खड्डे आढळून आले. 

साठे चौक ते ज्युबिली पार्कदरम्यान ५५९ खड्डे
जिल्हाधिकारी कार्यालय (साठे चौक) ते ज्युबिलीपार्क दरम्यानच्या व्हीआयपी मूव्हमेंट असलेल्या अडीच किलोमीटरच्या रस्त्यात वाहनधारकांना सर्वाधिक म्हणजे ५५९ खड्ड्यांशी सामना करावा लागतो. विशेष म्हणजे या पाहणीत टाऊनहॉलच्या उड्डाणपुलावरही ३१ खड्डे पडल्याचे समोर आले आहे. 

चौकांची अवस्था बिकट 
हर्सूल टी पॉइंट ते बाबा पेट्रोलपंपदरम्यान हडको चौक, उद्धवराव पाटील चौक, अण्णा भाऊ साठे चौक, सुभेदारी चौक, नौबत दरवाजा, आमखास, भडकल गेट, ज्युबिली पार्क, मिलकॉर्नर, वरद गणेश चौक असे चौरस्ते पडतात. यात वरद गणेश मंदिर, मिलकॉर्नर वगळता एकही चौक खड्डेमुक्त राहिलेला नाही. अनेक चौकांतील खड्डे सहा इंचांपर्यंत खोल गेल्याने अपघात होत असल्याची माहिती संबंधित वाहतूक पोलिसांनी दिली. 

Web Title: aurangabad news road pothole