तणावपूर्ण वातावरणात रिपाइंची सभा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जानेवारी 2018

औरंगाबाद - ‘‘ फॉर्म्युला तयार करून ऐक्‍य होत असल्यास माझा गट बरखास्त करायला तयार आहे. त्यासाठी प्रकाश आंबेडकरांपासून सर्वजण एकत्र येणे गरजेचे आहे. समता सैनिक दलाच्या भूमिकेशी आपण सहमत आहोत,’’ असे केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी स्पष्ट केले. ऐक्‍यासाठी तयार नसलेल्यांना गावबंदी करण्याचे आवाहन करीत त्यांनी भाषण आटोपते घेतले. 

औरंगाबाद - ‘‘ फॉर्म्युला तयार करून ऐक्‍य होत असल्यास माझा गट बरखास्त करायला तयार आहे. त्यासाठी प्रकाश आंबेडकरांपासून सर्वजण एकत्र येणे गरजेचे आहे. समता सैनिक दलाच्या भूमिकेशी आपण सहमत आहोत,’’ असे केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी स्पष्ट केले. ऐक्‍यासाठी तयार नसलेल्यांना गावबंदी करण्याचे आवाहन करीत त्यांनी भाषण आटोपते घेतले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या २४  व्या वर्धापन दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे कला, वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणावर रविवारी (ता.१४) आयोजित जाहीर सभा तणावपूर्ण  वातावरणात पार पडली. समता सैनिक दलाच्या घोषणांनी वातावरण चिघळले होते. पोलिसांनी हस्तक्षेप करीत एका कार्यकर्त्याचा आठवले यांच्याशी संवाद घडवून आणला. कडेकोट पोलिस बंदोबस्तात तासाभरात निवडक नेत्यांच्या छोटेखानी भाषणाने सभा आटोपती घेण्यात आली.

‘मरगळलेल्या मनामनाची चला तपासू नाडी, उभी करू भीम वाडी, या भीमगीताने पाचच्या सुमारास सभा सरू झाली. राजाभाऊ शिरसाट यांच्या संचाने भीमगीते सादर केली. या वेळी रिपाइंचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम, भुपेश थुलकर, मिलिंद शेळके, गौतम भालेराव, दौलत खरात, अनिल गोंडाने, प्रशांत शेगावकर, अरविंद अवसरमोल, दिलीप जोशी, संजय ठोकळ, किशोर थोरात, बाळकृष्ण इंगळे, कुसुमताई खरात, निर्मल खरात उपस्थित होते. नागराज गायकवाड यांनी आभार मानले. 

पोलिसांची पळापळ 
समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांकडून सभेत घोषणाबाजीला सुरवात होताच पोलिसांनी तत्काळ त्यांना घेराव घालत शांततेचे आवाहन केले. समता सैनिक दलाच्या एका कार्यकर्त्याचा आठवले यांच्याशी संवाद घडवून आणला. काही काळ शांतता राहिल्यानंतर पुन्हा घोषणाबाजी झाली. पोलिस आयुक्त यशस्वी यादव, संजय ठोकळ, नागराज गायकवाड यांनी समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. सभा संपेपर्यंत तणावाचे वातावरण होते. 

एक तासाचा घटनाक्रम 
६.०५-रामदास आठवले यांचे आगमन
६.०६ -पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांच्याकडून ड्रोन कॅमेरा फिरविण्यात आला. 
६.१० - समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
६.११   पोलिसांचा समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांना घेराव 
६.१५- पोलिस निरीक्षक कांबळे यांनी एका कार्यकर्त्याचा आठवले यांच्याशी संवाद घडविला. 
६.२०- त्या कार्यकर्त्याला पोलिस आयुक्तांनी  भेट घेत दिली समज.
६.२५- पोलिसांनी जमाव पांगविला. 
६.३५- जमावाकडून खुर्च्या फेकण्यात आल्या. 
६.४०- नागराज गायकवाड, संजय ठोकळ समजवण्यास गेले असता बाचाबाची 
६.५०- रामदास आठवले यांच्या भाषणाला सुरवात 
७.०२- भाषण आटोपून जय भीम करीत रवाना झाले.

Web Title: aurangabad news RPI