...अन्‌ त्यांच्या अश्रूंतून वाहिली व्यथा

जलील पठाण
सोमवार, 31 जुलै 2017

औसा - तालुक्‍यातील समदर्गा येथील शंकर गिराम या शेतकऱ्याने कर्जास व नापिकीस कंटाळून आपली जीवनयात्रा संपविली. त्यामुळे उघड्यावर पडलेल्या त्या तीन अनाथ मुलांबाबत ‘सकाळ’ने शुक्रवारी (ता. २८) ‘आईबाबांच्या अकाली निधनाने उघड्यावर आली मुले’ हे वृत्त प्रकाशित केले आणि त्या कुटुंबाला व मुलांना आधार देण्यासाठी सामाजिक, राजकीय व प्रशासनातील शेकडो हात पुढे आले. त्यात मुलांच्या पालनपोषणासह शिक्षणाची जबाबदारी उचलण्याची तयारी दाखवत जी सामाजिक बांधिलकी जपली त्याचे कौतुक होत असून निराधार मुलांना एक आधार मिळाला आहे. 

समदर्गा येथील शंकर गिराम या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याला पाच एकर कोरडवाहू शेती. कुटुंबातील सदस्य नऊ. नापिकी आणि चार मुलींचे लग्न यामुळे शंकर गिराम यांच्यावर कर्जाचा डोंगर चढला होता. त्यात पत्नी शारदाबाईला दुर्धर आजाराने ग्रासले. तिच्या उपचारासाठी मोठा खर्च झाला. पण नियतीला तिचे जगणेच मंजूर नव्हते. तीही त्यांना सोडून गेली. एकांतात राहणाऱ्या शंकरची अवस्था त्यांच्या जिवावर उठली आणि त्यांनी सोमवारी (ता. २४) गावातील एका विहिरीत उडी घेऊन मरणाला कवटाळले. त्यांच्या पश्‍चात असणारी अल्पवयीन मुले बालाजी, सोमनाथ व पुरुषोत्तम हे तिघेही अनाथ झाले असून विझलेली चूल आणि पोटाची आग हे विदारक चित्र असताना पुढे जगायचे कसे, असा प्रश्‍नही या मुलांसमोर उभा ठाकला आहे. या संदर्भात ‘सकाळ’ने गिराम कुटुंबाची व्यथा मांडली. दुसऱ्याच दिवशी मदतीचे अनेक हात पुढे आले. यामध्ये मनसेचे जिल्हाध्यक्ष नरसिंह भिकाणे यांनी थेट समदर्गा गाठत त्या कुटुंबातील त्या मुलांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज शासनाला माफ करण्यासाठी पाठपुरावा करून त्यांच्या शैक्षणिक पालनपोषणाची जबाबदारी उचलण्याची तयारी दाखविली. तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांनीही त्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्‍वासन दिले. उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते व तहसीलदार आहिल्या गाठाळ यांनी समदर्गा येथे जाऊन शासकीय मदतीसोबतच सामाजिक मदतीचा आधार घेऊन या मुलांच्या भविष्यासंदर्भात जे काही चांगले करता येईल यासाठी तयारी दर्शविली आहे. 

‘सकाळ’ची बांधिलकी
दुष्काळाचे दुष्टचक्र तालुक्‍यावर कायम असताना यातून बाहेर पडण्यासाठी सामाजिक हात शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे राहत आहेत. कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून पन्नासहून अधिक शेतकऱ्यांनी तालुक्‍यात आत्महत्या केल्या आणि हे सत्र अजूनही सुरूच आहे. याबाबत बांधिलकी जपत ‘सकाळ’ने नेहमी अशा कुटुंबांना मदत व्हावी म्हणून पुढाकार घेतला आहे. या पूर्वीही तालुक्‍यातील लखनगाव येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या सोनाली पंडित लांडगे या मुलीची व्यथा मांडली होती. मदत नको मला काम द्या असे वृत्त सलग चार दिवस प्रकाशित केले होते. त्यामुळे या मुलीला औशाचे आमदार बसवराज पाटील आणि उस्मानाबाद जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष ब्रिजलाल मोदानी यांच्या सहकार्यातून तिला बॅंकेत नोकरी मिळाली आणि ती मुलगी आज कुटुंबाची कर्ती बनली. अशाचपद्धतीने गिराम कुटुंबाला सामाजिक बांधिलकीतून मदतीचे हात पुढे यावे.

Web Title: aurangabad news sakal farmer