शाळांचा मुलांच्या जिवाशी खेळ सुरू

मधुकर कांबळे 
गुरुवार, 15 जून 2017

औरंगाबाद - शिक्षणाविषयी जागरुकता वाढल्याने प्रत्येक आई-वडील आपल्या लाडक्‍या पाल्यांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा, यासाठी धडपडत असतात. यासाठी क्षमता नसतानाही मोठा आर्थिक भार सहन करून आपल्या काळाजाच्या तुकड्याला चांगल्या शाळेत शिकायला पाठवितात. मात्र, या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षाच रामभरोसे असल्याचे पाहणीत समोर आले आहे. 

औरंगाबाद - शिक्षणाविषयी जागरुकता वाढल्याने प्रत्येक आई-वडील आपल्या लाडक्‍या पाल्यांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा, यासाठी धडपडत असतात. यासाठी क्षमता नसतानाही मोठा आर्थिक भार सहन करून आपल्या काळाजाच्या तुकड्याला चांगल्या शाळेत शिकायला पाठवितात. मात्र, या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षाच रामभरोसे असल्याचे पाहणीत समोर आले आहे. 

सध्या शहरात ८४७ शाळा आहेत. यापैकी केवळ १०४ शाळांमध्येच अग्निशमन नियंत्रण यंत्रणा बसविण्यात आली असून आपत्कालीन व्यवस्थेची उपाययोजना करण्यात आली आहे. ७४३ शाळांमध्ये आपत्कालीन व्यवस्थाच नसल्याचे जीवघेणे चित्र आहे. दरम्यान, ‘शाळांची दुकानदारी’ सुरू करणाऱ्या काही शाळांनी तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे सर्रासपणे काणाडोळा केला आहे. जिल्ह्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळांना सुरवात झाली असून, मराठी माध्यमाच्या शाळा गुरुवारी (ता. १५) सुरू होणार आहेत. पालकांच्या शाळेच्या प्रवेशद्वारासमोर रांगा दिसत आहेत.

इंग्रजीचे महत्त्व ओळखून तर अनेकजण शेजाऱ्याचा मुलगा मुलगी इंग्रजी माध्यमात शिकतो म्हणून आपल्या पाल्यासही इंग्रजीतच शिकविणार, असा विचार करून इंग्रजी शिक्षणाकडील पालकांचा ओढा वाढत आहे. पालकांचा हा ओढा ओळखून गल्लोगल्ली इंग्रजी माध्यमाच्या बालवाड्या, नर्सरीपासून दहावीपर्यंतच्या शाळांचे पेव फुटत आहे. १६ जुलै २००४ रोजी तमिळनाडूतील कुंभकोनम येथे एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील अग्निकांडाच्या घटनेत तब्बल ९४ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेपासून अद्यापही संस्थाचालकांनी व प्रशासनाने कोणताही बोध घेतलेला दिसत नाही. जिल्हा परिषदेकडील नोंदीनुसार जिल्ह्यात ४ हजार १९० शाळा आहेत. यापैकी शहरात अनुदानित, विनाअनुदानित, खासगी व महापालिकेच्या सर्व शाळांची संख्या ८४७ इतकी आहे. शहरी भागात फक्‍त १०४ शाळा, महाविद्यालयांना अग्निशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळाले आहे.

महाराष्ट्र फायर प्रिव्हेन्स ॲण्ड लाईफ सेफ्टी मेजर्स ॲक्‍ट २००६-०७ मधील तरतुदीनुसार शाळांमधील सुरक्षिततेसंदर्भात नियम घालून दिले आहेत. मात्र, या नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसते. ग्राउंड फ्लोअर व एक मजला असणाऱ्या शाळेच्या इमारतीमध्ये खोलीनिहाय एक आग नियंत्रण उपकरण असले पाहिजे. इलेक्‍ट्रिकल पॅनेलजवळ एक स्वतंत्र उपकरण असले पाहिजे. अंडरग्राउंड मजला असेल तर तिथे स्प्रिंक्‍लर सिस्टीम असावी आणि इमारतीच्या वर ४ ते ५ हजार लिटर पाणीसाठा असला पाहिजे. 

पंधरा मीटरपर्यंत उंचीच्या इमारतीसाठी ग्राउंड फ्लोअर त्यावर दोन मजले असतील तर आग नियंत्रण उपकरण, होजरिल पाईप आणि तो वरच्या १० हजार लिटर पाणीसाठा असलेल्या टाकीला जोडलेला असला पाहिजे. अग्निशमन यंत्रणा पोचण्यापूर्वीच शाळा व्यवस्थापनाने आग भडकू नये यासाठी उपाययोजना करण्यासाठीही ही व्यवस्था हवी. अग्निशमन यंत्रणा पोचण्यासाठी किमान १० ते १२ फूट जागा असली पाहिजे.

पंधरा मीटरपेक्षा अधिक उंचीच्या शाळेच्या इमारतीसाठी आग नियंत्रण उपकरणे, होजरिल पाईप, इमारतीवर २५ हजार लिटर क्षमतेचा पाणीसाठा पाहिजे.

शाळेत एकपेक्षा जास्त मजले असतील तर जिन्याची रुंदी २ किंवा ३ मीटर असली पाहिजे. याशिवाय चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी स्वतंत्र जिने असले पाहिजेत.

Web Title: aurangabad news school children