शांघाई ऑटोमोटिव्ह गुजरातवासी!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जुलै 2017

औरंगाबाद - किया मोटर्स आणि एलजीपाठोपाठ जगातील सर्वांत मोठ्या ऑटो कंपन्यांपैकी एक असलेल्या शांघाई ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीज कॉर्पोरेशननेही औरंगाबादला हुलकावणी दिली आहे. शांघाई मोटर्ससाठीच्या स्पर्धेत गुजरातने बाजी मारली असून कंपनी आणि गुजरात सरकार यांच्यात सामंजस्य करारही करण्यात आला आहे. 

औरंगाबाद - किया मोटर्स आणि एलजीपाठोपाठ जगातील सर्वांत मोठ्या ऑटो कंपन्यांपैकी एक असलेल्या शांघाई ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीज कॉर्पोरेशननेही औरंगाबादला हुलकावणी दिली आहे. शांघाई मोटर्ससाठीच्या स्पर्धेत गुजरातने बाजी मारली असून कंपनी आणि गुजरात सरकार यांच्यात सामंजस्य करारही करण्यात आला आहे. 

चीनमधील शांघाई ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन (एसएआयसी) या कंपनीने भारतात आपले उत्पादन सुरू करण्याची घोषणा केल्याच्या आठवडाभरातच हा प्रकल्प कुठे जाणार याचा फैसला झाला आहे. औरंगाबाद आणि गुजरातमधील हलोल यांच्यात हा प्रकल्प आपल्याकडे नेण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू होती. औरंगाबादेतून सलग तिसरा उद्योग गेल्याने मराठवाडा पुन्हा एकदा मोठ्या गुंतवणुकीला मुकला आहे. औरंगाबादेत दिल्ली, मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या औद्योगिक वसाहतीत अद्याप एकही मोठा प्रकल्प आलेला नाही. कियो मोटर्सचा प्रकल्प औरंदगाबादेत येता येता तेलंगानाच्या दिशेने गेला. या शिवाय तीस हजार लोकांना रोजगार देण्याची क्षमता असलेली दक्षिण कोरियन कंपनी एलजी इलेक्‍ट्रॉनिक्‍सनेही औरंगाबादेत चाचपणी केली होती. हा प्रकल्पही स्थानिक राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे नागपूरला गेला.

एसएआयसीशी औरंगाबादसाठी बोलणी सुरू असल्याची खुद्द उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पुष्टी केली होती. असे असतानाही हा प्रकल्प गुजरातकडे गेल्याने आरंभीच्या २००० कोटींच्या गुंतवणुकीला मुकावे लागले आहे. 

शांघाई गेल्याचे बॅनर लावा
औरंगाबादेतून प्रकल्प जात असल्याचा विषय लोकसभेतही मांडला. केंद्र सरकारच्या महाराष्ट्राकडील दुर्लक्षाचा मराठवाड्याला तोटा होत आहे. येथे प्रकल्प देण्यासाठी सरकार दुजाभाव करते. आता हा प्रकल्प गुजरातला गेल्याचे बॅनर भाजपने लावावे आणि गुजरात सरकारचे अभिनंदन करावे. 
-खा. चंद्रकांत खैरे, शिवसेना उपनेते

क्षमतेचे मार्केटिंग होईना
उद्योग मराठवाड्यात, पुण्यात की विदर्भात न्यायचा या संकुचित विचारात अडकल्याने मराठवाड्याला असे तोटे सहन करावे लागतात. औरंगाबादेतील ऑटो उद्योगाची जगभरात ख्याती असताना केवळ याचे मार्केटिंग केले जात नसल्याने उद्योग जात आहेत. मोठे उद्योग गेले तर लघु उद्योगांनाही घरघर लागेल. 
- सुनील कीर्दक, अध्यक्ष, मसिआ

राज्यकर्त्यांचे अपयश
औरंगाबादेत उद्योग यावेत यासाठी बलस्थानांची ताकद दाखविण्यात येथील राज्यकर्ते कमी पडत आहेत. हे सर्वपक्षीय अपयश असले तरी सत्ताधारी भाजपा - शिवसेनेची यात जास्त जबाबदारी आहे. दोघे सत्तेत एकत्र बसूनही असे उद्योग जाणार असतील तर या नेत्यांना विकासाशी देणे-घेणे नसल्याचे सिद्ध होते. 
- आ. इम्तियज जलील, एमआयएम

माहिती घेऊन सांगतो 
औरंगाबादेतून एसएआयसीचा प्रकल्प गेल्याची आपल्याला काही माहिती नाही. याविषयी माहिती घेऊन सांगतो. औद्योगिक संघटनांच्या कार्यालयाशी संपर्क करून माहिती घेऊन मी बोलेन. 
- आ. अतुल सावे, भाजपा

Web Title: aurangabad news Shanghai Automotive Industries